अबब.... ! महापालिका भाड्याच्या वाहनांवर करणार दोन वर्षांत तब्बल ४५ कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 13:26 IST2018-10-24T13:16:50+5:302018-10-24T13:26:54+5:30
शासनाच्या या अध्यादेशाचा संदर्भ घेत महापालिकेच्या वतीने यापुढे छोट्या गाड्या खरेदी न करता बांधा व वापरा(बीओटी)वर भाडेतत्त्वार घेण्यात येणार आहे.

अबब.... ! महापालिका भाड्याच्या वाहनांवर करणार दोन वर्षांत तब्बल ४५ कोटींचा खर्च
पुणे: महापालिकेकडे पुरेसे वाहनचालक नसल्याने ज्या सेवा आऊट सोर्सिंगद्वारे करणे शक्य आहे. त्यासेवा आऊट सोर्सिगकरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. शासनाच्या या अध्यादेशाचा संदर्भ घेत महापालिकेच्या वतीने यापुढे छोट्या गाड्या खरेदी न करता बांधा व वापरा(बीओटी)वर भाडेतत्त्वार घेण्यात येणार आहे. यासाठी स्वयंभु ट्रान्सपोर्ट यांना प्रतिवर्षी २२ कोटी ५० लाख रुपये देण्यास मान्यता देण्यात आली. त्यांना हे काम दोन वर्षासाठी दिले आहे. यामुळे भाड्याने वाहने घेण्यासाठी दोन वर्षांत तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडे एकूण ११८७ विविध प्रकारची वाहने कार्यरत आहेत. ही वाहने घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, विद्युत, अग्निशमन दल, पथ विभाग, मलनि:सारण विभाग, स्थानिक संस्था कर, अतिक्रमण/अनाधीकृत बांधकाम निर्मुलन विभागसामान्य प्रशासन विभाग परिमंडल विभाग इत्यादी अत्यावश्यक सेवा असलेल्या विभागांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, अग्निशमन विभाग याविभागामध्ये कार्यरत असणारी वाहने ही ३६५ दिवस २४ तास कार्यरत ठेवावी लागतात. सध्या महापालिकेकडे अपुरे वाहनचालक सेवक असल्याने महापालिकेच्या ज्या सेवा आऊट सोर्सिगद्वारे करणे शक्य व आवश्यक आहे. अशा सेवा आऊट-सोर्सिगद्वारे करण्यात याव्यात असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, अग्निशमन विभाग याविभागांसाठी पुढील दोन वर्षांसाठी वाहने भाड्याने घेण्याचे ठरविण्यात आले. यासाठी तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, या खर्चाला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.