शिवाजीनगर बसस्थानकाला अखेर लाभला मुहुर्त; १६ मजल्यांची इमारत उभी राहणार

By राजू इनामदार | Updated: February 12, 2025 16:26 IST2025-02-12T16:24:56+5:302025-02-12T16:26:41+5:30

बसस्थानक पाडले त्यावेळी महामंडळ व महामेट्रो कंपनी यांच्यात करार झाला

Shivajinagar bus stand finally gets a chance | शिवाजीनगर बसस्थानकाला अखेर लाभला मुहुर्त; १६ मजल्यांची इमारत उभी राहणार

शिवाजीनगर बसस्थानकाला अखेर लाभला मुहुर्त; १६ मजल्यांची इमारत उभी राहणार

पुणे : महामेट्रोच्या भूयारी स्थानकामुळे ५ वर्षांपूर्वी वाकडेवाडी येथे स्थलांतरीत झालेल्या शिवाजीनगर बस स्थानकाच्या पूर्वीच्याच जागेवरील नव्या इमारतीच्या बांधकामाला अखेर मुहुर्त मिळाला. महाराष्ट्रदिनी ( १ मे) नव्या इमारतीचे भूमीपूजन होणार आहे. तळमजल्यावर बसस्थानक व वरील बाजूस सरकारी तसेच खासगी कार्यालयांची १६ मजली इमारत असे नव्या बसस्थानकाचे स्वरूप असेल. या प्रकल्पाचा खर्च तब्बल ६०० कोटी रूपये असून भूमीपूजनानंतर ३ वर्षात त्याचे बांधकाम पूर्ण होईल.

मुंबईत बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार , परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये मंत्रालयात बुधवारी सकाळी या स्थानकाच्या संदर्भात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (ऑन लाईन), महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर, नगरविकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी बैठकीला होते.

उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार होण्याबरोबरच वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वाच्या प्रकल्पांसाठी चांगले विकसक मिळण्यासाठी ९९ वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

प्रवाशांना होत आहे त्रास

पुण्याची ओळख असणाऱ्या शिवाजीनगर बसस्थानकाची महामेट्रोने त्याच जागेवर मेट्रोचे भूयारी स्थानक प्रस्तावित केल्यामुळे रयाच गेली. ५ वर्षांपूर्वी हे स्थानक वाकडेवाडीला हलवण्यात आले. तेव्हाासून पुणेकर एसटी प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटीने नियमीत प्रवासी करणारी काही लाख प्रवासी पुण्यात आहेत. घरापासून वाकडेपर्यंत येण्यासाठी त्यांना रिक्षालाच एसटीच्या तिकीटापेक्षा दुप्पट खर्च करावा लागतो आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी स्थानकात उतरल्यानंतर तर यापेक्षाही जास्त पैसे रिक्षासाठी मोजावे लागतात. या खर्चाने पुणेकर त्रस्त झाले आहेत. मात्र त्यांच्या या त्रासाकडे ना महामेट्रोचे लक्ष होते, ना एसटी महामंडळाचे. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी यासाठी आंदोलने केली, मात्र आश्वासनांशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडत नव्हते.

एसटी महामंडळ व महामेट्रो कंपनीत मतभेद

बसस्थानक पाडले त्यावेळी महामंडळ व महामेट्रो कंपनी यांच्यात करार झाला होता. भूयारी स्थानक बांधून झाल्यानंतर महामेट्रो कंपनी बसस्थानक पूर्वी होते तसेच त्यांच्या खर्चाने बांधून देणार होती. मात्र त्यानंतर त्यांच्यात काही बेबनाव झाला. एसटी महामंडळ प्रशासनात राजकीय हस्तक्षेप होऊन या जागेवर बांधा वापरा हस्तांतर करा या तत्वावर व्यापारी संकूल बांधण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. मात्र दरम्यान सरकारमध्ये बदल झाले, बराच काळ परिवहन मंत्रीच नव्हते, त्यात हे काम रखडले. त्यानंतर पुन्हा सरकार बदलले, त्यातही हा प्रकल्प पुढे गेलाच नाही. नुकत्याच सत्तारूढ झालेल्या नव्या सरकारमध्ये आता या या प्रकल्पाला गती मिळाली असून आता तर भूमीपूजनाचा मुहुर्तच उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर केला आहे.

श्रेय घेण्यासाठी चपळाई

सलग ५ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठीच्या हालचाली मात्र फार चपळाईने होत आहेत. बुधवारी सकाळी बैठक झाल्यानंतर तासाभरातच बैठकीतील तपशीलाबाबतच्या एकापाठोपाठ एक अशा ३ प्रेसनोट प्रसिद्धीसाठी माध्यमांना प्राप्त झाल्या. त्यातील पहिली तर सरकारी जिल्हा माहिती कार्यालयाची होती. त्यानंतर लगेचच आमदार शिरोळे यांची नोट प्रसिद्ध झाली. त्याचबरोबर परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही लगेचच बैठकीची माहिती प्रसिद्धीस दिली. पुणेकरांची मात्र, श्रेय घ्यायचे तितके घ्या, मात्र स्थानक पूर्वीपेक्षा दिमाखदार बांधून एकदाचे सुरू करा अशीच एकमेव भावना आहे.

बांधकामाला लागणार ३ वर्ष

शिवाजीनगर बसस्थानकातून दररोज दोन हजार गाड्यांची ये-जा होते. मुंबईला जाणाऱ्या बहुसंख्य गाड्या इथूनच सुटतात. त्याशिवाय विदर्भ, मराठवाडा, खानदेश इकडे जाण्यासाठी हेच एकमेव स्थानक आहे. पुण्यातून एसटी ने नियमीत प्रवास करणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. त्या सर्वांनाच वाकडेवाडीला जाण्यायेण्यासाठीचा त्रास सहन करावा लागतो आहे. अजूनही ३ वर्षे त्यांना हा त्रास सहन करावा लागेल असे दिसते. मात्र स्थानकांचे काम निदान कागदोपत्री तरी मार्गी लागल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

नव्या शिवाजीनगर बसस्थानाची वैशिष्ट्ये

-- ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ (पीपीपी- पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्त्वावर बांधकाम

-- खाली बसस्थानक व वर व्यावसायिक संकूल

--स्थानकाच्याही खाली वाहनतळासाठी दोन तळघर.

-- १६ मजली इमारत

-- ६०० कोटी रूपयांचा खर्च

-- बांधकाम पूर्ण होण्यासाठी ३ वर्षे अपेक्षित

Web Title: Shivajinagar bus stand finally gets a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.