Shirur Nagar Parishad Election Result 2025: शिरूर नगरपरिषदेमध्ये बहुमत भाजपला; पण नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:09 IST2025-12-21T16:07:25+5:302025-12-21T16:09:42+5:30
२४ पैकी ११ जागांवर विजय : राष्ट्रवादी ७ तर शरद पवार गटाला मिळाल्या केवळ पाच जागा

Shirur Nagar Parishad Election Result 2025: शिरूर नगरपरिषदेमध्ये बहुमत भाजपला; पण नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा
शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षित कामगिरी करत २४ पैकी ११ नगरसेवक निवडून आणत बहुमत मिळवले आहे. मात्र, नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी १,९२५ मतांच्या आघाडीने विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐश्वर्या पाचर्णे यांना ८,७९९ मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या अलका खंडरे यांचा पराभव केला. खंडरे यांना ६,८७४ मते मिळाली. भाजपच्या सुवर्णा लोळगे या सुरुवातीच्या तीन फेऱ्यांपर्यंत दुसऱ्या क्रमांकावर होत्या; मात्र अखेरीस त्या तिसऱ्या स्थानी फेकल्या गेल्या.
नगरसेवकपदाच्या २४ जागांसाठी अत्यंत अटीतटीची लढत झाली. यात भाजपचे ११ उमेदवार विजयी झाले. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- ७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)- ५, तर १ अपक्ष उमेदवार विजयी झाला. अनेक प्रभागांमध्ये अनपेक्षित निकाल लागले असून, माजी नगरसेवक तसेच त्यांच्या कुटुंबातील उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.
२ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर न्यायालयीन आदेशामुळे तब्बल २० दिवसांनी आज मतमोजणी पार पडली. त्यामुळे निकालाबाबत शिरूरकरांमध्ये मोठी उत्सुकता होती. सकाळी १० वाजता कडक पोलिस बंदोबस्तात नगरपरिषद कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. २४ टेबलांवर चार फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण झाली.
निकाल जाहीर होताच सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते आनंद साजरा करत होते. काही ठिकाणी डीजेसह मिरवणुका काढण्याचा प्रयत्न झाला; मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. तरीही अनेक प्रभागांमध्ये छोट्या मिरवणुकांतून विजय साजरा करण्यात आला. दिवसभर शिरूर शहरात आनंदाचे वातावरण होते.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार व मिळालेली मते
१. ऐश्वर्या पाचर्णे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) - ८,७९९
२. सुवर्णा लोळगे (भाजप) - ६,७४२
३. अलका खंडरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) - ६,८७४
४. रोहिणी बनकर (शिंदेसेना) - ३९०
५. वैशाली वखारे (अपक्ष) - ४८१
६. नोटा - १८६
..............................................
विजयी नगरसेवक
प्रभाग १ अ - संगीता मल्लाव (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
१ ब - नीलेश गाडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभाग २ अ - स्वप्नाली जमादार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
२ ब - एजाज बागवान (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभाग ३ अ - सुनील जाधव
३ ब - आयेशा सय्यद (अपक्ष)
प्रभाग ४ अ - सुनीता पोटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
४ ब - नितीन पाचर्णे (भाजप)
प्रभाग ५ अ - सुनीता भुजबळ (भाजप)
५ ब - संतोष थेऊरकर (भाजप)
प्रभाग ६ अ - सुनीता कुरंदळे (भाजप)
६ ब - दिनेशकुमार मांडगे (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)
प्रभाग ७ अ - सागर नरवडे (भाजप)
७ ब - पूजा पोटावळे (भाजप)
प्रभाग ८ अ - चारुशीला कोळपकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
८ ब - गादिया मितेश (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
प्रभाग ९ अ - रवी ढोबळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
९ ब - सविता राजापुरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
प्रभाग १० अ - स्वाती साठे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
१० ब - नीलेश संजय पवार (भाजप)
प्रभाग ११ अ - स्वीटी शिंदे (भाजप)
११ ब - अमित कर्डिले (भाजप)
प्रभाग १२ अ - उमेश शेळके (भाजप)
१२ ब - रिंकू जगताप (भाजप)