'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 11:05 IST2025-10-21T10:33:19+5:302025-10-21T11:05:07+5:30
शनिवारवाडा शुद्धीकरण प्रकरणात नीलम गोऱ्हेंनी भाजप खासदार मेधा कुलकर्णींना थेट इशारा दिला आहे.

'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
Shaniwar Wada Row: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर, पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या 'शुद्धीकरण' प्रकरणावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. शनिवार वाड्यात काही महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक होत तिथे जाऊन शुद्धीकरण केले होते. यावेळी त्यांनी शनिवारवाडा परिसरातील मजार काढून टाकण्याची मागणी केली. यावरुन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही मित्रपक्षांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे.
शनिवारवाड्याच्या परिसरात काही मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेचा निषेध करत भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह रविवारी त्या जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. एवढेच नाही तर, शनिवारवाड्याबाहेरील दर्गा आणि मजार एका आठवड्यात हटवण्याचा अल्टिमेटमही त्यांनी दिला. मेधा कुलकर्णींच्या या कृतीनंतर मित्रपक्षांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट भाजपला आपल्या खासदाराला लगाम घालण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. "आम्ही भाजपला त्यांच्यावर लगाम घालण्याची मागणी करत आहोत. जातीय तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा," अशी मागणी ठोंबरे यांनी केली. हिंदू-मुस्लिम पुण्यात गुण्यागोविंदाने राहत असताना कुलकर्णींनी असे करण्याची गरज नव्हती, असेही त्या म्हणाल्या. सोमवारी सायंकाळी त्यांनी कुलकर्णींविरोधात आंदोलनही केले. भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर अल्पसंख्याक समाजातील मतदारांवरची पकड पुन्हा मजबूत करण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नाचा हा भाग असल्याचे मानले जात आहे.
हिंदुत्ववादी विचार घेऊन सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही या मुद्द्यावर मेधा कुलकर्णींवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मेधा कुलकर्णी यांना कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये असं म्हटलं. "शनिवारवाडा हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे संरक्षित स्थळ आहे. येथे काय करावे आणि काय करू नये, याचे काही नियम आहेत आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे. नियम मोडले गेले असतील तर त्यासाठी राज्य सरकारचे पोलीस आहेत. अशावेळी कोणीही स्वतःच आम्हीच सरकार असल्यासारखे वागू नये. नियमांचे उल्लंघन झाल्यास जिल्हाधिकारी आणि राज्य पोलिसांनी कारवाई करावी, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
दरम्यान, पुण्यातील राजकारण तापले मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी संरक्षित स्थळी नमाज अदा करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यात, स्थानिक निवडणुकांपूर्वी महायुतीतील अंतर्गत वाद आणि राजकीय तणाव स्पष्टपणे समोर आला आहे.