शिंदे सरकार सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालत आहे : प्रशांत जगताप
By निलेश राऊत | Updated: March 18, 2024 14:32 IST2024-03-18T14:32:39+5:302024-03-18T14:32:55+5:30
राज्य सरकारचे धोरण हे बिल्डर धार्जिणे असल्याचा आरोप करून, वाकडेवाडी येथील आरे डेअरी येथे पक्षाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले...

शिंदे सरकार सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालत आहे : प्रशांत जगताप
पुणे : महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून सरकारी आस्थापनांची स्व. यशवंतराव चव्हाण यांनी निर्मिती केली. पण या सरकारी आस्थापनांची मोक्याच्या अर्थात वाकडेवाडी या ठिकाणी असलेली जमीन कवडीमोल भावात विकण्याचं पाप राज्यातील सरकार ( शिंदे-पवार-फडनवीस ) करत आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (शरद पवार गट) करण्यात आला.
राज्य सरकारचे धोरण हे बिल्डर धार्जिणे असल्याचा आरोप करून, वाकडेवाडी येथील आरे डेअरी येथे पक्षाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह या निषेध आंदोलनात उदय महाले, गणेश नलावड़े, राजू साने, रमीज सैयद, रोहन पायगुड़े, प्रसाद गावड़े, आशाताई साने, किशोर कांबले, स्वप्निल जोशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जगताप म्हणाले, महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, पुण्यासह महाराष्ट्रातील जनतेला सकस दुधाचा पुरवठा व्हावा यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आरे डेअरीची स्थापना केली. पुढे राजकीय नेत्यांनीच स्वतःचे दूध संघ काढल्याने हा आरे दूध संघ डबघाईला आला. पुणे शहराच्या अगदी प्रवेशद्वारावर वाकडेवाडी येथे मोक्याच्या ठिकाणी असलेली आरे डेअरीची तब्बल १६ एकर जमीन विकण्याचा डाव आता या सरकारने मांडला आहे. १० हजार कोटी रुपयांची जमीन ४०० कोटीपेक्षा कमी किंमतीत विकण्यात कोणाचं हित आहे, असा प्रश्नही यावेळी जगताप यांनी उपस्थित केला.