पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. त्यांनी पलायन केले त्यावेळी त्यांना काही जणांनी मदत केली. याप्रकरणी प्रीतम वीरकुमार पाटील, मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव, राहुल दशरथ जाधव या पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना पुणेन्यायालयानेन्यायालयीन कोठडी सुनावली होती. गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती. या सर्वांना आता 25 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
वैष्णवी हगवणे (वय २३) हिने मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी १७ मे रोजी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा आपला मुलगा सुशील याच्यासह पसार झाला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेक वाहने बदलून फार्म हाउस आणि लाॅजवर आश्रय घेतला. त्यासाठी अनेक जणांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पितापुत्राला मदत केली. त्यांना आर्थिक मदत करून आश्रय देखील दिला. त्यामुळे पोलिसांना चकवा देणे त्यांना शक्य झाले. सात दिवसानंतर त्यांना पुण्यातील स्वारगेट येथून अटक करण्यात आली. दरम्यान त्यांनी वडगाव मावळ, लोणावळा, सातारा तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आश्रय घेतल्याचे समोर आले आहे. त्यावरून पोलिसांनी संशयितांना आश्रय देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली होती.
पाचही जण राजकीय पदाधिकारी
प्रीतम पाटील हा कर्नाटकातील माजी उर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे. वीरकुमार पाटील हे २८ वर्षे काँग्रेसचे आमदार होते. बंडू लक्ष्मण फाटक हा मुळशी तालुक्यातील शिरोली चांदोली या गावाचा माजी सरपंच आहे. मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे हा वडगाव मावळ ग्रामपंचायतीचा माजी सदस्य व भाजपचा वडगाव मावळ शहराचा माजी अध्यक्ष आहे. बंडू भेगडे याची पत्नी मंगल भेगडे या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत. पुसेगाव येथील अमोल जाधव आणि राहुल जाधव हे शेतकरी असून त्यांच्याकडे हगवणे यांनी बैल सांभाळण्यासाठी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.