चाकण : पुणे-नाशिक महामार्गापासून खेड तालुक्याच्या पश्चिमेला १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडेश्वर डोंगरावरील महादेव मंदिरात श्रावणी सोमवारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुर्दैवी घटनेत १० महिलांचामृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघाताने कुंडेश्वर डोंगराच्या रस्त्याच्या सुरक्षिततेवर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने पाइंटजवळील पापळवाडी येथून ३५ महिला आणि दोन लहान मुले अशी एकूण ३७ जण पिकअप वाहनातून कुंडेश्वर येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी जात होती. मात्र, घाटाच्या पहिल्याच वळणावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन मागे सरकत पाच ते सहा पलट्या खात खोल दरीत कोसळले. या अपघातात १० महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुंडेश्वर डोंगरावर जाणारा घाट रस्ता अरुंद, कच्चा आणि धोकादायक वळणांनी युक्त आहे. काही ठिकाणी तीव्र चढ-उतार असून, रस्त्याला संरक्षक कठडे किंवा भिंती नाहीत. दोन वाहने समोरासमोर आल्यास चालकांना मोठी कसरत करावी लागते. यासोबतच रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या होत्या, परंतु प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही, अशी माहिती समोर येत आहे.
या अपघाताने प्रशासनाला जाग येण्याची गरज आहे. रस्त्याची दुरुस्ती, संरक्षण कठडे, सुसज्ज पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. कुंडेश्वर डोंगराच्या विकासासाठी वन विभाग आणि जिल्हा परिषदेने अनेक उपाययोजना केल्या असल्या, तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अधिक प्रयत्नांची गरज आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर प्रशासनाला जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सोशल मीडियाने वाढवली लोकप्रियता, पण सुरक्षेकडे दुर्लक्ष
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कुंडेश्वर डोंगर आणि येथील महादेव मंदिराची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त या तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळाकडे भाविक आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे. श्रावण महिन्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
प्रशासनावर आरोप, कारवाईची मागणी
या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. “वाढत्या पर्यटक आणि भाविकांच्या संख्येकडे प्रशासनाने लक्ष दिले असते, तर ही घटना टाळता आली असती,” असे स्थानिकांचे म्हणणे आहे.