जय पवारांच्या लग्नाबद्दल प्रश्न, शरद पवार भडकले; म्हणाले, 'काही तारतम्य ठेवत जा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 22:16 IST2025-03-15T22:06:49+5:302025-03-15T22:16:22+5:30
अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरले आहे. त्यांचा साखरपुडा होणार आहे, त्याबद्दल शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता.

जय पवारांच्या लग्नाबद्दल प्रश्न, शरद पवार भडकले; म्हणाले, 'काही तारतम्य ठेवत जा'
Sharad Pawar Jay Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरले आहे. दोन दिवसांपूर्वी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी शरद पवारांना साखरपुड्यांचे निमंत्रणही दिले. याबद्दलच शरद पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला, जो ऐकून ते चांगलेच संतापले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी बीडमधील गुन्हेगारी आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना जय पवार यांच्या लग्नाबद्दल आणि साखरपुड्याच्या निमंत्रणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न ऐकून त्यांचा पारा चढला आणि त्यांनी प्रश्न विचाणाऱ्या पत्रकाराला सुनावलं.
'जय पवार यांनी दहा तारखेला होत असलेल्या साखरपुड्याचं निमंत्रण दिलं आहे. कुटुंब एकत्र येणार आहे', असं विचारत असतानाच शरद पवार म्हणाले, "हा काही प्रश्न आहे? पण, हा काही आहे का? काय विचारावं, याचं तारतम्य तर ठेवत जा", अशा शब्दात पवारांनी सुनावलं.
जयंत पाटलांच्या नाराजीच्या मुद्द्यावर काय बोलले?
गेल्या तीन-चार दिवसांत जयंत पाटलांच्या एका विधानाची भरपूर चर्चा झाली. ते नाराज असल्याचे दावेही काही पक्षातील नेत्यांकडून केले गेले. या सगळ्या चर्चांवर जयंत पाटलांनी खुलासा केला.
जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चांबद्दल शरद पवारांनाही प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, "त्यांनी उत्तर दिलं आहे. आज वर्तमानपत्रात छापून आलं आहे. त्यांनी ते उत्तर बारामतीमध्ये दिलं आहे."
बीडमधील गुन्हेगारीबद्दल काय बोलले पवार?
बीडमध्ये मागील तीन महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांची चर्चा होत आहे. त्यावर बोलताना पवार म्हणाले, "काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत. राज्य सरकारने कोण आहे, याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करतो अशासंबंधी अत्यंत सक्त असे धोरण आखण्याची गरज आहे. बीडला पूर्वीच्या वैभवाचे दिवस परत कसे येतील, याची काळजी घ्यावी", असे शरद पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोलताना म्हणाले.