विधानसभेतील अपयश पचवून शरद पवारांची स्थानिक निवडणुकांसाठी पुन्हा उभारी

By राजू इनामदार | Updated: February 17, 2025 15:55 IST2025-02-17T15:54:43+5:302025-02-17T15:55:18+5:30

२८ फेब्रुवारीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शऱद पवार) पक्षाच्या सर्व आजी माजी खासदार आमदार व नगरसेवकांची बैठक

Sharad Pawar comeback for local elections after digesting the failure in the assembly | विधानसभेतील अपयश पचवून शरद पवारांची स्थानिक निवडणुकांसाठी पुन्हा उभारी

विधानसभेतील अपयश पचवून शरद पवारांची स्थानिक निवडणुकांसाठी पुन्हा उभारी

पुणे : आधी लोकसभा निवडणुकीतील दैदिप्यमान यश व नंतर विधानसभेतील अपयश पचवून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने उभारी घेतली आहे. २८ फेब्रुवारीला त्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शऱद पवार) पक्षाच्या सर्व आजी माजी खासदार आमदार व नगरसेवकांची बैठक आयोजित केली आहे.

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. २५ फेब्रुवारीला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांचा निकाल अपेक्षित आहे. इतर मागावर्गीय ( ओबीसी) गटांसाठीच्या राखीव जागा त्यांची अधिकृत लोकसंख्या नोंदणी झाली नसताना निश्चित कशा करणार या व आणखी काही मुद्द्यांवर ही सुनावणी असून त्यात राज्य सरकार प्रतिवादी आहे. याच कारणावरून मागील सलग ५ व ३ वर्षे राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका यांच्या सार्वत्रित निवडणूकाच झालेल्या नाहीत. सर्व ठिकाणी प्रशासकीय कारभार सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांमधील या निवडणूका लढवू इच्छिणारे या प्रशासकीय अवस्थेला कंटाळले असून निवडणूकांच्या प्रतिक्षेत आहेत.

एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यातील अपवाद वगळता सर्वच जिल्हा परिषदा व मोठ्या महापालिकांवर वरचष्मा होता. अजित पवार बाजूला गेल्यानंतर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकच झालेली नाही. अजित पवार आता राज्यातील महायुती सरकारमध्ये आहेत, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र गट आहे व आमचाच पक्ष खरा हा त्यांचा दावा विधानसभा अध्यक्ष स्तरावर मान्य झाला आहे. त्यामुळेच शरद पवार आता त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन या निवडणूकीत काय करणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. स्वत: पवार यांनीच पुढाकार घेत मुंबईतील या बैठकीचे आयोजन केले असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar comeback for local elections after digesting the failure in the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.