"शरद पवार साहेब आणि अजितदादा प्रामाणिकपणे आघाडी सरकार टिकवणार", रोहित पवारांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 15:22 IST2022-06-21T15:22:25+5:302022-06-21T15:22:34+5:30
रोहित पवार माऊलींचे दर्शन घेऊन मुंबईला रवाना

"शरद पवार साहेब आणि अजितदादा प्रामाणिकपणे आघाडी सरकार टिकवणार", रोहित पवारांचा विश्वास
आळंदी : काळजी करू नका. कारण महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आमदार रोहित पवार यांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते.
विधानपरिषदेच्या निवडणूकीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती तापलेली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार म्हणाले, कोणीही काळजी करू नका. महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही. कारण देशाचे जेष्ठ नेते शरद पवार साहेबांनी ही महाविकास आघाडी केली आहे. सर्वांना एकत्रित जोडण्याच्या हेतूने ही आघाडी स्थापन केली आहे. पण काही लोकांना जोडणे पसंत नसते. म्हणून ते तोडण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु जेष्ठ नेते शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मित्र पक्षांचे नेते प्रामाणिकपणे सरकार टिकवणार आहेत.
ज्यावेळी मंत्री एकनाथ शिंदे संपर्कात येतील; त्यावेळी ते स्वतः का नॉट रीचेंबल झाले होते ते स्पष्ट करतील. तूर्तास आघाडीचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान रोहित पवार माऊलींचे दर्शन घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत.