आपत्तीकालातही आरोग्य व्यवस्थेत सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:09 IST2021-05-01T04:09:19+5:302021-05-01T04:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: शहरात एकूण रुग्णालये किती, खाटा किती, रुग्ण किती, डिस्चार्ज किती, खाटा रोज रिकाम्या किती या ...

आपत्तीकालातही आरोग्य व्यवस्थेत सावळा गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: शहरात एकूण रुग्णालये किती, खाटा किती, रुग्ण किती, डिस्चार्ज किती, खाटा रोज रिकाम्या किती या सगळ्याच स्तरावर सावळा गोंधळ आहे. किमान आपत्तीकालात तरी ही सर्व माहिती एकत्र ठेवावी, रुग्णांचे रूग्णालयातील प्रवेश केंद्रीय पद्धतीने करावे याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
आम आदमी पार्टीने रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मदत करण्यासाठी हेल्प डेस्क केला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने याप्रकारची व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे तिथे रूग्णाला घेऊन कोणत्याही नातेवाइकाला कुठेही वणवण फिरावे लागत नाही. एकाच ठिकाणी फोन केला की जागा कुठे रिकामी आहे ती माहिती नातेवाइकांना कळवली जाते. रूग्णालय व्यवस्थापनालाही त्वरित सतर्क केले जाते. खासगी रूग्णालयांचाही यात समावेश आहे.
पुणे शहरात अशी काहीही व्यवस्था निर्माण केली गेली नाही. खासगी रूग्णालये महापालिकेला काहीही न कळवता त्यांच्याकडे आलेल्या रूग्णांना थेट प्रवेश देतात. महापालिकेकडेच मुळात कोणत्या खासगी रूग्णालयात किती खाटा आहेत, त्यातल्या व्हेंटिलेटर असलेल्या किती, ऑक्सिजन असलेल्या किती, आयसीयू कक्ष किती याची माहिती नाही असा आपच्या हेल्प डेस्कचा अनुभव आहे. खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते, पण या बेडचे व्यवस्थापन त्यात्या खासगी रुग्णालयाकडेच आहे, त्यावर महापालिकेचा काहीच अधिकार नाही, असे या हेल्प डेस्कच्या कार्यकर्त्यांनी लोकमतबरोबर बोलताना सांगितले.
व्हेंटिलेटरची संख्याही निश्चित नाही. ते कोणत्या रूग्णालयात आहेत हेही कोणाला माहिती नाही. यामुळे महापालिकेचा डॅशबोर्ड म्हणजे फक्त एक डिझाईन झाला आहे अशी टीका आपच्या हेल्प डेस्कचे समन्वयक मुकुंद किर्दत यांनी केली.
शहरातील सर्व कोरोना रुग्णांचे खासगी अथवा सार्वजनिक रूग्णालयातील प्रवेश महापालिकेच्या माध्यमातूनच होतील, अशी व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली. ही मागणी राजकीय हेतूने वगैरे नाही तर हेल्प डेस्कला आलेल्या अनुभवातून करत आहे असे ते म्हणाले. त्याहीपेक्षा कोरोना आपत्तीत सापडलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांंना दिलासा म्हणून तरी अशी व्यवस्था महापालिका आयुक्तांनी तातडीने करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी आपच्या हेल्प डेस्कचे कार्यकर्ते सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य करण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले.---//
मुंबई लोकमत ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेने सर्व खासगी रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांचे प्रवेश महापालिकेच्या माध्यमातूनच करणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर अशीही माहिती मिळाली की तिथे होम आयसोलेशन केलेल्या रुग्णाच्या घरी महापालिकेचे डॉक्टर जातात, तपासणी करतात, रूग्ण गंभीर वाटला की त्वरित त्याला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करतात. बेड रिकामा झाला की त्याची माहिती महापालिकेला त्वरित कळवणे सर्व खासगी रुग्णालयांना सक्तीचे करण्यात आले आहे. -//