पुणे : सोसायटीच्या आवारात लावलेल्या सात दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना सोमवारी पहाटे नऱ्हे येथील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीत घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत सागर पहलाज ललवाणी (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी ललवाणी हे नऱ्हे परिसरातील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीच्या आवारात लावलेल्या दुचाकींना सोमवारी पहाटे आग लागल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलास दिली.
अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत रहिवाशांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सात दुचाकी जळाल्या आहेत. दुचाकी जाळण्यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आहेत.