नुकसान झालेल्या भातशेतीच्या दुरुस्तीसाठी सात जेसीबी यंत्र पुरविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:12 IST2021-07-29T04:12:37+5:302021-07-29T04:12:37+5:30
राजगुरुनगर: खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेच्या वतीने सात जेसीबी यंत्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार ...

नुकसान झालेल्या भातशेतीच्या दुरुस्तीसाठी सात जेसीबी यंत्र पुरविणार
राजगुरुनगर: खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेच्या वतीने सात जेसीबी यंत्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे सदस्य बाबाजी काळे यांनी केली.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसैनिकांनी बॅनरबाजी न करता राज्यावर आलेल्या आपत्ती संकटात सापडलेल्या बांधवांसाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन शिवसेनेच्या नेत्यांनी केले होते. तालुक्यातील पश्चिम भागातील तीन खोऱ्यांत झालेल्या अतिवृष्टीने चिखलगाळ झालेल्या शेतजमीन पुन्हा दुरुस्त करण्याची आर्थिक क्षमता सर्वच शेतकऱ्यांमध्ये नाही. भातशेतीची कामे उरकल्यानंतर भातखाचरातले पाणी हटल्यानंतर सात जेसीबी अशा शेतकऱ्यांच्या मदतीला देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे सदस्य बाबाजी काळे यांनी सांगितले.
काळे यांनी पश्चिम भागात नुकसानग्रस्त मंदोशी गावची जावळेवाडी आणि एकलहरे गावाला भेट देऊन पाहाणी केली व तेथील शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटविकास अधिकारी अजय जोशी, बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश कानडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, पंचायत विस्तार अधिकारी जी. पी. शिंदे, आदिवासी विभागाचे तालुका समन्वयक गणेश गावडे, राहूल मलघे, पप्पू राक्षे, प्रकाश सातपुते, संतोष पानसरे आदी उपस्थित होते.