‘प्रायोरिटी ठरवा’! बैठकीसाठी उशिरा आलेल्या नगरसेवकांना शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे खडेबोल
By किरण शिंदे | Updated: February 8, 2026 19:45 IST2026-02-08T19:44:58+5:302026-02-08T19:45:27+5:30
भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर पदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

‘प्रायोरिटी ठरवा’! बैठकीसाठी उशिरा आलेल्या नगरसेवकांना शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे खडेबोल
किरण शिंदे / पुणे : महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत वेळेचे पालन न केल्यामुळे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे खडे बोल सुनावले. काही नगरसेवक उशिरा पोहोचल्याने तर काही गैरहजर राहिल्याने त्यांनी बैठकीतच नाराजी व्यक्त केली.
उद्या होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर पदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी अर्ज दाखल केल्याने मतदानाची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या ११९ नगरसेवकांसाठी मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला भाजपचे गटनेते गणेश बिडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, महामंत्री राजेश पांडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सर्व नगरसेवकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. तरीही काही नगरसेवक उशिरा पोहोचले, तर काही अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले.
यावर बोलताना धीरज घाटे यांनी नगरसेवकांना शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. “बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांशी संपर्क साधला का? महापौर-उपमहापौर निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. लग्नतिथी किंवा इतर कारणांमुळे अनुपस्थित राहणे योग्य नाही. इथून पुढे प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
तसेच सभागृहातील वर्तन आणि उपस्थितीवर संपूर्ण शहराचे लक्ष असते, याची जाणीव ठेवून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. “आपण सभागृहात काय बोलतो आणि कसे वागतो हे नागरिक पाहत असतात. त्यामुळे पक्षाच्या सूचनांचे पालन करणे आणि सर्वसाधारण सभांना वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे,” असेही घाटे यांनी सांगितले. थोडक्यात महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या बैठकीत पक्षशिस्तीवर भर देण्यात आला.