निम्म्या कर्मचार्यांच्या बळावर अग्निशामक दल देतेय सेवा; दिवाळीतही सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 15:46 IST2017-10-18T15:44:34+5:302017-10-18T15:46:58+5:30
अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचार्यांपैकी फक्त ४९० कर्मचारी सध्या आहेत़ इतकी कमी संख्या असूनही ते सेवेमध्ये मात्र कोठेही कमी पडत नसल्याचे दिसून येत आहे़

निम्म्या कर्मचार्यांच्या बळावर अग्निशामक दल देतेय सेवा; दिवाळीतही सज्ज
पुणे : दिवाळी, उन्हाळ्याचे दिवस शहरात आगी लागल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते़ तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडपडीच्या घटना मोठ्या संख्येने होतात, अशावेळी सर्व जण १०१ क्रमांकावर फोन करुन मदत मागतात आणि काही मिनिटात अग्निशामक दलाचे जवान तत्परतेने घटनास्थळावर हजर होतात. अशा या अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणार्या अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचार्यांपैकी फक्त ४९० कर्मचारी सध्या आहेत़ इतकी कमी संख्या असूनही ते सेवेमध्ये मात्र कोठेही कमी पडत नसल्याचे दिसून येत आहे़
पुणे महापालिकेच्या हद्दीत सध्या १३ अग्निशामन केंद्रे आहेत़ महापालिकेचा विस्तार आणि लोकसंख्या पाहता त्यांची ३० तरी संख्या असण्याची गरज आहे़ महापालिकेच्या हद्दीत नुकताच ११ गावांचा समावेश करण्यात आला़ त्यामुळे आता त्यांच्यासाठीही अग्निशामन सेवा पुरविण्यासाठी तेथे अग्निशामक दलाची केंद्रे उभारावी लागणार आहेत़
याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की दिवाळीत आता आहेत, त्या सर्व कर्मचार्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत़ अग्निशामक दलाकडे हॅडोलक क्रेनपासून बुलेटपर्यंत ७२ वाहने आहेत़ ती सर्व सुसज्ज ठेवण्यात आली आहेत़ रुग्णवाहिकाही तयारीत ठेवण्यात आल्या आहेत़ नवीन अग्निशामन केंद्रासाठी काही जागा ताब्यात आल्या आहेत़ काहीचे बांधकाम सुरु असून येत्या ३ वर्षात ते पूर्ण करणार आहेत़ नवीन गावांच्या समावेशाचा विचार केल्यास त्या ठिकाणी जागा मिळाल्यास नवीन केंद्र उभारण्याचा विचार होऊ शकेल़
रॉकेट, पॅराशुटमुळेच आगीच्या घटना
दिवाळीत प्रामुख्याने आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात़ अग्निशामक दलाने केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये आगीच्या घटनांमध्ये घट झाली आहे़ गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या १७ घटना घडल्या होत्या़ दिवाळीत उडविले जाणारे फटाकेच प्रामुख्याने आगीला कारणीभूत ठरतात़ त्यातील अनेक आगी या रॉकेट आणि पॅराशुट या फटक्यांमुळे लागल्या होत्या़ रॉकेट व्यवस्थित आकाशात न जाता ते इकडे तिकडे जाण्यामुळे वाळलेले गवत, कचरा कुंडी, झाडे पेटून आगी लागल्याचा घटना प्रामुख्याने घडतात़ त्यामुळे असे फटाका उडविताना सर्वांनी काळजी घ्यावी़
फटाके उडविताना घ्यावयाची दक्षता
* लहान मुलांना एकट्याने फटाके उडवू देऊ नका़ त्यांच्या सोबत मोठ्या व्यक्तींनी रहावे़
* पेटते फुलबाजे शरीरापासून दूर धरावेत़ पेटते फुलबाजे वरुन खाली टाकू नयेत़ तसेच खालून वर फेकू नयेत़
* फटाके उडविताना टेरिकॉट, टेरिलिन, नायलॉन इत्यादी कृत्रिम धाग्यांपासून बनविलेले कपडे वापरु नयेत़ तसेच फटाके कधीही खिशात ठेवू नयेत़
* भुईनळे हातात धरुन उडवू नयेत़
* भुईचक्र व जमिनीवर फिरणारे फटाके लाथाळू नयेत़
* बाण उडविताना ते मोकळ्या जागेत, बाटलीत सरळ ठेवून उडवावेत़ हातात धरुन उडवू नयेत़
* आकाशात उंचावर उडणारे फटाके टेरेसवर, बाल्कनीमध्ये पडून बºयाचदा आगी लागतात़ त्यामुळे दिवाळीत टेरेसवरील तसेच बाल्कनीमधील टाकाऊ तसेच अन्य वस्तू काढून टाकाव्यात़
* फटाक्यावर डबा किंवा अन्य वस्तू झाकून उडवू नयेत़ त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते़
* फटाके न फुटल्यास अशा फटाक्यांची दारू काढून ते पेटवू नयेत़ त्यामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते़
* फटाके उडविताना, हाताशी पाणी राहील अशी व्यवस्था करावी़ चुकून भाजल्यास भाजलेला भाग पाण्याखाली धरावा़ फुलबाजे वापरुन झाल्यावर त्याची तार इतरत्र न टाकता त्वरीत पाण्यात टाकावी़
* खिडक्या, दरवाज्यांना असलेल्या पडद्याखाली पणत्या लावू नयेत़
* आपत्कालीन प्रसंगी अग्निशामक दलाशी १०१ वर संपर्क साधावा़