पुण्यातील नायडू रुग्णालयात भीतीच्या सावटाखाली ‘कोरोना’ संशयितांची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 02:55 PM2020-03-04T14:55:42+5:302020-03-04T14:55:55+5:30

काम करताना मोठी जोखीम, पण जबाबदारी महत्त्वाची..

Service of 'Corona' suspects in the shadow of fear in the pune | पुण्यातील नायडू रुग्णालयात भीतीच्या सावटाखाली ‘कोरोना’ संशयितांची सेवा

पुण्यातील नायडू रुग्णालयात भीतीच्या सावटाखाली ‘कोरोना’ संशयितांची सेवा

Next
ठळक मुद्देभारतात कोरोनाचा प्रभाव नसला तरी नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण संशयित रुग्णांची तपासणी करण्यापासून त्यांना औषधे, जेवण देण्यापर्यंतची सर्व कामे

राजानंद मोरे
पुणे : कोरोना विषाणुची लागण झाल्याच्या संशयावरून विलीगीकरण कक्षात दाखल झालेल्या रुग्णांची सेवा करणाऱ्या नायडू रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांवर भीतीचे सावट आहे. जगभरातील अनेक देशांना कोरोनाचा विळखा पडला आहे. या संसर्गावर कोणतेही औषध नाही, याची जाणीव असूनही जोखीम पत्करून ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. संशयित रुग्णांची तपासणी करण्यापासून त्यांना औषधे, जेवण देण्यापर्यंतची सर्व कामे त्यांना करावी लागत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘वैद्यकीय कीट’ असले तरी ‘कोरोना’ची धास्ती ‘नायडू’मध्ये प्रकर्षाने जाणवत आहे.
कोरोना बाधित देशातून विमानाने आलेल्या प्रवाशांची तपासणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच करून आवश्यकतेनुसार त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. तर इतर प्रवाशांचा पुढील १४ दिवस पाठपुरावा केला जात आहे. त्यांच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांना कक्षात दाखल केले जात आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष आहेत. मंगळवारपर्यंत ७२ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. भारतात कोरोनाचा प्रभाव नसला तरी नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. नायडू रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाºयांना तर कोरोना बाधित रुग्णांना दररोज हाताळावे लागत आहे. 
नायडू रुग्णालय हे संसर्गजन्य आजारांसाठीच आहे. तेथील डॉक्टर, परिचारिका व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना त्याची जाणीव आहे. पण सध्या कोरोना विषाणुचा धोका जगभर वाढत चालल्याने त्यांच्यामध्येही भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयामध्ये सध्या संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. या कक्षामध्ये पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट (पीपीई) कीट घालूनच प्रवेश करावा लागतो. या कीटमध्ये विषाणुंपासून संपुर्ण शरीराचे संरक्षण करणारा पेहराव असतो. ही कीट घालूनच डॉक्टर व परिचारिकांना रुग्णाची तपासणी करावी लागते. त्यांना औषध देणे, घशातील द्रवपदार्थाचा नमुना घेणे, त्यांची माहिती घेणे, जेवण देणे यासाठी कीट घालून कक्षात प्रवेश करावा लागतो. तसेच या रुग्णांसाठी काही ठराविक डॉक्टर व परिचारिकांना नियुक्त करण्यात आले आहे. कीट असले तरी कोरोनाची धास्ती असल्याचे एका कर्मचाऱ्यांने ‘लोकमत’ला सांगितले.
..............

मुख्य प्रवेशद्वारापासूनच धाकधूक...
कोरोना विषाणूसाठी विलगीकरण कक्ष सुरू झाल्यानंतर नायडूमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षारक्षकांकडून विचारपूस केली जात आहे. कशासाठी आला, कोणाकडे जायचे, काय झाले, ही विचारणा करूनच आत सोडले जात आहे. विनाकारण कोणालाही प्रवेश दिला जात नाही. कोणत्याही परदेशी व्यक्तीने आत प्रवेश केला की सुरक्षारक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांची धावपळ होते. त्यांच्यासाठी रुग्णालय इमारतीबाहेरच मदतीची सुविधा करण्यात आली आहे. 
------------------

कुटूंबही घाबरलेय...............
कोरोना विषाणुच्या धोक्याबाबत आता कुटूंबीयांनाही माहिती आहे. आम्ही दररोज संशयित रुग्णांसोबत वावरत असल्याने कुटूंबीयही घाबरले आहेत. दररोज तब्बेतीची विचारणा केली जाते. आम्हालाही कुटूंबातील इतरांना कोणत्याही विषाणुचा संसर्ग होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी लागते. पण असे असले तरी शेवटी कोरोनाची भिती त्यांच्या मनातून जात नाही. पण हा आमच्या कामाचाच भाग असल्याने घाबरून चालत नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

.....................................

दररोज शास्त्रीय प्रशिक्षण 
कोरोना संशयित रुग्णांना हातळणाऱ्या डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी व सायंकाळी रुग्णालयात शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाते. कक्षात प्रवेश करण्यासाठीचा सुट कसा घालायचा, कसा काढायचा याबाबत माहिती दिली जाते. आतापर्यंत आम्ही ७१ रुग्ण हाताळले आहेत. त्यामुळे सर्व कर्मचारी रुग्णांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्यामध्ये कसलीही भीती नाही- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

................................

कीटचा एकदाच वापर
विलगीकरण कक्षात जाण्यासाठीच्या कीटचा वापर एकदाच केला जात आहे. वापर झाल्यानंतर हे कीट पुन्हा वापरले जात नाही. एका कीटची किंमत सुमारे एक हजार रुपये आहे. पण संसर्गाचा धोका लक्षात घेऊन ते नष्ट करण्यात येते. दररोज सायंकाळी वापरलेले सर्व कीट जैववैद्यकीय कचºयामध्ये नष्ट केले जाते. त्याची यंत्रणा कार्यान्वित आहे.

Web Title: Service of 'Corona' suspects in the shadow of fear in the pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.