: Serum Institute Fire 'Covishield' vaccine safe; The fire did not cause any casualties; Information of Adar Poonawala | 'सिरम'मधून दिलासादायक बातमी : 'कोविशिल्ड' लस सुरक्षित; आगीत कुठलीही जीवितहानी नाही

'सिरम'मधून दिलासादायक बातमी : 'कोविशिल्ड' लस सुरक्षित; आगीत कुठलीही जीवितहानी नाही

पुणे : मांजरी येथील सिरम इन्स्टिट्युटमधील एका इमारतीला गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.आणि थोड्याच दिवसांपूर्वी कोविशिल्ड लसचे वितरणकरून एकप्रकारे दिलासा मिळालेल्या प्रत्येकाच्या मनात या आगीमुळे कोविशिल्ड लस सुरक्षित आहे का, आगीचे लस उत्पादनावर काय परिणाम होईल यांसह अनेक प्रश्न उपस्थित झाले त्याचवेळी सिरममधून सर्वांना दिलासा देणारी बातमीसमोर आली आहे. सध्या आगीने जरी रौद्ररूप धारण केले असले तरी कोविशिल्ड लस सुरक्षित आहे. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सिरमचे सीईओ अदर पूनावाला याांनी स्पष्ट केले आहे. 

आज दुपारी मांजरी येथील सिरम कंपनीच्या एका इमारतीला भीषण आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  पण आग इतकी भीषण आहे की अग्निशामक दलाच्या जवानांना  आत्तापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. तसेच धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात असून  आग वेगाने पसरत आहे.  मांजरीकडील बाजूला असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. 

सिरम इन्स्टिट्युट येथे सध्या कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन सुरु आहे. भारतासह शेजारील राष्ट्रांना या लसीचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र आग लागलेल्या इमारतीत कोविशिल्ड चे उत्पादन होत नसून तिथे बीसीजी लस निर्मितीची प्रक्रिया सुरू असते. सध्या या इमारतीत फर्निचर व इलेक्ट्रिक काम सुरू होते अशी माहिती समोर आली आहे. तसेच कोविशिल्ड लस ही पूर्णपणे सुरक्षित असून तिला कुठलाही धोका नसल्याचे सिरमकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. 

केंद्रीय पथकाने घेतली आगीची माहिती..

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या भीषण आगीची माहिती मिळताच केंद्रीय तपास पथकाने दखल घेत सिरममध्ये फोन करत कोविशिल्ड लस व तिच्या सुरक्षिततेविषयी विचारपूस केली आहे.सिरम इन्स्टिट्यूट मध्ये लागलेल्या आगीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली आहे. तसेच आगी संदर्भातला अहवाल केन्द्रिय पथकाला द्यावा लागणार आहे. घटनास्थळी एक एनडीआरएफची एक तुकडी रवाना करण्यात आली आहे.

आग विझवणे आणि हानी टाळणे याला प्राधान्य: उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे. 
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
....
आगीत कोणीही जखमी नाही...: अदर पुनावाला
सिरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला लागलेल्या आगीत कोणतीही जिवित हानी झालेली नाही. कोणीही जखमी झाले नाही़ मात्र, इमारतीतील काही मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती अदर पुनावाला यांनी टिष्ट्वट करुन दिली आहे. 
इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढणे याला आम्ही महत्व देत आहोत, असे त्यांनी कळविले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: : Serum Institute Fire 'Covishield' vaccine safe; The fire did not cause any casualties; Information of Adar Poonawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.