'मोरुची मावशी'चे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 10:23 AM2018-05-04T10:23:27+5:302018-05-04T10:52:08+5:30

मराठी रंगभूमीवर धुमशान करणाऱ्या, मैलाचा दगड ठरलेल्या 'मोरुची मावशी' या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे आज पुण्यात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते.

Senior director Dilip Kolhatkar passed away in Pune | 'मोरुची मावशी'चे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात निधन

'मोरुची मावशी'चे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात निधन

पुणे - मराठी रंगभूमीवर धुमशान करणाऱ्या, मैलाचा दगड ठरलेल्या 'मोरुची मावशी' या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे आज पुण्यात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते.  पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी (4 मे) सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील मुशाफिरीत त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांची 'कवडी चुंबक', 'राजाचा खेळ', 'मोरूची मावशी',  'बिघडले स्वर्गाचे दार' ही नाटकं विशेष गाजली. मोरूची मावशी या विनोदी नाटकाने रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 1984च्या 'पार्टी' आणि 1991च्या 'शेजारी शेजारी' या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या नाटकांसाठी त्यांनी काहीकाळ नेपथ्य आणि प्रकाशयोजनेचे काम केले होते. विजया मेहता यांच्या 'जास्वंद' नाटकामध्ये त्यांनी काम केले होते. 'चिरंजीव आईस' या भाग्यश्री देसाई निर्मित नाटकाचेदेखील ते दिग्दर्शक होते. मोहन वाघ यांच्याबरोबरही त्यांनी पुष्कळ नाटकं केली.  त्यामध्ये 'गोड गुलाबी' आणि ' गोष्ट जन्मांतरीची' या नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. कोल्हटकर यांचे सुरुवातीचे वास्तव्य मुंबईत होते, त्यानंतर ते 2002 नंतर ते पुण्यात आले.

दरम्यान, दिलीप कोल्हटकर यांच्या पश्चात सासू आणि मुलगी असा परिवार आहे. दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली यांची 9 फेब्रुवारी 2018ला हत्या झाली होती. त्यांच्या नोकरानेच संतापाच्या भरात गळा आवळून आणि डोक्यावर प्रहार करून दिपाली यांची हत्या केली होती.

दिलीप कोल्हटकरांना मानाचा मुजरा - पुरुषोत्तम बेर्डे
दिलीप कोल्हटकर... तो नाटकाच्या रिहर्सलला आलेल्या मित्रांकडे नजर लावून बसायचा. ते कुठे दाद देतायत किंवा नाही याकडे लक्ष देऊन असायचा. अपेक्षेने मिष्किल हसायचा. मी त्याच्या  'कवडीचुंबक', 'बिघडले स्वर्गाचे दार', या  दोन नाटकांचं संगीत दिग्दर्शन  केले.  प्रायोगिक रंगभूमीवरुन कारकीर्द सुरु करुन  व्यावसायिक रंगभूमीवरवर ठसा उमटवणाऱ्या दिलीप कोल्हटकरला माझा मानाचा मुजरा.

 

Web Title: Senior director Dilip Kolhatkar passed away in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.