परदेशात डान्स स्पर्धेला पाठवतो; पालकांना १६ लाखांचा गंडा, नृत्य प्रशिक्षकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:20 AM2023-12-11T10:20:32+5:302023-12-11T10:21:43+5:30

पालकांकडून लाखो रुपये उकळल्यावर मुलांना पाठवण्याची वेळ आली तेव्हा प्रशिक्षक टाळाटाळ करू लागला होता

Sends to dance competitions abroad Parents extorted 16 lakhs dance instructor arrested | परदेशात डान्स स्पर्धेला पाठवतो; पालकांना १६ लाखांचा गंडा, नृत्य प्रशिक्षकाला अटक

परदेशात डान्स स्पर्धेला पाठवतो; पालकांना १६ लाखांचा गंडा, नृत्य प्रशिक्षकाला अटक

पुणे : हंगेरी येथील बुडापेस्टमधील वर्ल्ड रॉक ॲन्ड रो या स्पर्धेत सहभागी हाेण्याची संधी तुमच्या मुला-मुलींना मिळत असल्याचे सांगत पालकांकडून लाखो रुपये उकळले. मात्र, जेव्हा मुलांना पाठवण्याची वेळ आली तेव्हा टाळाटाळ करू लागला. अखेर पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीनृत्य प्रशिक्षक स्वप्निल मिलिंद लोंढे (वय ३३, रा. वडगाव बुद्रुक) याला अटक केली आहे.

याबाबत एका महिला पालकांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सहावीत शिकत आहे. नांदेड सिटीमधील डान्स स्टुडिओमध्ये हीपहॉप नृत्य शिकायला जाते. त्या ठिकाणी असलेला सहायक नृत्य प्रशिक्षक स्वप्निल लोंढे याने सर्व पालकांची ऑगस्टमध्ये मीटिंग घेतली. डिसेंबरमध्ये हंगेरीतील बुडापेस्ट येथे वर्ल्ड रॉक ॲन्ड रोल स्पर्धा होणार आहे. गेली पाच वर्षे या स्पर्धेत मुलांना घेऊन जात आहे. या टूरसाठी प्रत्येक व्यक्तीला ८४ हजार रुपये खर्च येणार आहे. बरोबर पालक असेल, असे सांगितले. फिर्यादी यांनी तीन लाख ३६ हजार रुपये दिले. इतर पालकांनीही पैसे जमा केले; परंतु, स्पर्धेची वेळ जवळ येऊ लागली तसे तो टाळाटाळ करू लागला. तेव्हा त्याने खोटे स्पर्धेचे पेपर व बनावट विमानाची तिकिटे दाखवली. ९ डिसेंबर रोजी बुडापेस्ट येथे स्पर्धा सुरू होणार असल्याचे लक्षात आले व आपली मुले स्पर्धेत जाऊ शकणार नाही, हे लक्षात आल्यावर पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी स्वप्निल लोंढे याला अटक केली. न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

याबाबत हवेली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वंगाडे यांनी सांगितले की, स्वप्निल लोंढे याने अनेकांकडून जवळपास १६ लाख रुपये घेतले आहेत. सध्या एका पालकांनी फिर्याद दिली असून आणखी पालक पुढे येत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक विकास अडागळे यांनी सांगितले की, स्वप्निल लोंढे हा गेली काही वर्षे मुलांना बुडापेस्टला पाठवत होता. पालकांकडून घेतलेले पैसे त्याने स्वत: वापरले. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून येणारा फंड उशिरा आल्याचे तो सांगत आहे.

Web Title: Sends to dance competitions abroad Parents extorted 16 lakhs dance instructor arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.