नवले पुलावर अपघातांची मालिका सुरुच; दिवसभरात दुसऱ्यांदा गाड्यांची धडक, एक जखमी
By किरण शिंदे | Updated: December 8, 2025 20:36 IST2025-12-08T20:34:20+5:302025-12-08T20:36:11+5:30
पुण्यातील नवले पुलावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरुच आहे.

नवले पुलावर अपघातांची मालिका सुरुच; दिवसभरात दुसऱ्यांदा गाड्यांची धडक, एक जखमी
Navale Bridge Accident: पुण्याच्या नवले पुलावर दिवसभरात दुसऱ्यांदा अपघात झाला असून एका व्यक्तीला किरकोळ जखम झाली आहे. भूमकर चौकाजवळ दोन ते तीन गाड्यांची परस्पर धडक झाली. याच ठिकाणी सकाळी स्कूल व्हॅनचा अपघात झाला होता. संध्याकाळच्या अपघातानंतर नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अपघातातील वाहने रोडच्या बाजूला हलवण्यात आली असून पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
सकाळच्या सुमारास भूमकर चौकाजवळ स्कूल बसने पुढे जात असलेल्या पंच कारला मागून जोरदार धडक दिली, यात कारचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. सुदैवाने स्कूल बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. अपघाताचे स्वरूप किरकोळ असले तरी, स्कूल बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. मात्र, या घटनेमुळे पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातांच्या मालिकेवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
नवले पुलावर सातत्याने अपघात होत असल्याने या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी आणि अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.