विद्यार्थ्यांच्या अंतर्वस्त्रांवरदेखील  ‘‘शाळेची बंधने’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 09:31 PM2018-07-04T21:31:43+5:302018-07-04T21:37:55+5:30

एमआयटीतील विश्वशांती गुरुकुल शाळेच्या प्रशासनाने यापुढील काळात विद्यार्थिनींनी पांढऱ्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावित, इतकेच नव्हे तर स्कर्टची लांबी काय असावी, अशा जाचक अटी घातल्या आहेत.

The school's underwear also includes "school boundaries" | विद्यार्थ्यांच्या अंतर्वस्त्रांवरदेखील  ‘‘शाळेची बंधने’’

विद्यार्थ्यांच्या अंतर्वस्त्रांवरदेखील  ‘‘शाळेची बंधने’’

Next
ठळक मुद्देएमआयटीच्या गुरुकुल शाळेची सक्ती : पालक-विद्यार्थ्यांचा संताप, आगळी वेगळी नियमावली जाहीरया शाळेने अशाप्रकारच्या सुमारे २० ते २२ जाचक अटींची सक्ती केल्याचा आरोप पालकांच्या कृती समितीने शिक्षण आयुक्तांना अर्ज दिला असून, त्यावर ५९ पालकांनी सह्या

पुणे :  विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना आता कुठल्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावी याकडेदेखील शाळांनी लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. एमआयटीतील विश्वशांती गुरुकुल शाळेच्या प्रशासनाने यापुढील काळात विद्यार्थिनींनी पांढऱ्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावित, इतकेच नव्हे तर स्कर्टची लांबी काय असावी, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करू नये अशाप्रकारच्या तुघलकी नियमांची यादीच तयार केली आहे. यावर कडी म्हणजे या अटींचा भंग केल्यास पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  
  पुण्यातील माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल या शाळेच्या प्रशासनाने केवळ विद्यार्थ्यांवरच नाही तर पालकांवरही अशा जाचक अटी घातल्या आहेत. चिडलेल्या पालकांनी बुधवारी प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना घेराव घातला आणि शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुलच्या अंतर्गत येणाऱ्या श्री सरस्वती न्यू इंग्लिश शाळा, श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा आणि एमआयटी पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांसाठी डायरीमार्फत ही नियमावली जाहीर केली आहे. त्याहून कहर म्हणजे, या अटींचा भंग केल्यास पालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र लिहून आणण्याची सक्ती शाळेने केली आहे. त्यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली आहे. या शाळेने अशाप्रकारच्या सुमारे २० ते २२ जाचक अटींची सक्ती केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थिनींनी सौंदर्य प्रसाधने वापरू नयेत, टॅटू काढू नयेत, लिपस्टीक, लिप ग्लॉस किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स वापरायचे नाहीत, कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाहीत, कानातलेही जास्त मोठे नकोत आणि त्यांचा रंगही काळा, सोनेरी किंवा चंदेरीच असावा, विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या परवानगीशिवाय कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही, प्रशासन आणि माध्यमांसोबत पालकांनी संवाद साधू नये आदी अटींचाही यात समावेश आहे.

 
शाळेच्या डायरीत नमूद केलेले नियम-
- मुलींची अंतर्वस्त्र पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची असावी. 
- लिपस्टिक, लिप ग्लास किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स लावायचे नाहीत.
- कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाही.
- शाळेच्या परवानगीशिवाय विद्यार्थी आणि पालक, शाळेत किंवा शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर कुठल्याही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही.
- विद्यार्थी आणि पालकांनी शाळेविरोधात आंदोलन करु नये.
दरम्यान, विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून हे नियम तयार केल्याचं शाळेच्या प्रशासनाने सांगितलं आहे. मात्र, पालकांनी माध्यमांसमोर जाण्याच्या आधी शाळेशी बोलायला हवं होतं, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं आहे.

* कार्यकारी संचालक आउट आॅफ कव्हरेज 
एमआयटीच्या कार्यकारी संचालक सुचेत्रा कराड यांच्याशी या निर्णयाबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन सातत्याने आॅउट आॅफ कव्हरेज असल्याचे सांगण्यात आले. दुस-या बाजुला पालकांनी थेट माध्यमांशी संपर्क साधल्याबद्दल प्रशासन विभागाकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते आहे. संस्थेने नियमाविषयी काही आक्षेप असल्यास पालकांना बैठकीचे निमंत्रण दिले असतानाही देखील पालक उपस्थित न झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. 

*  तीव आंदोलनाचा ईशारा 
पालकांच्या कृती समितीने शिक्षण आयुक्तांना अर्ज दिला असून, त्यावर ५९ पालकांनी सह्या केल्या आहेत. टेमकर यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिका- यांना शाळेवर योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात अधिक माहितीसाठी स्वाती कराड-चाटे यांच्याशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही. शाळेवर कारवाई न केल्यास मनसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड विभागाचे अध्यक्ष सुधीर धावडे यांनी दिला.

Web Title: The school's underwear also includes "school boundaries"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.