Pune: स्कूल व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ला; वाघोलीतील बीजेएस कॉलेज जवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 19:43 IST2024-03-06T19:43:07+5:302024-03-06T19:43:55+5:30
ही घटना वाघोलीतील बकोरी फाटा येथे बीजेएस कॉलेजजवळ सकाळी नऊच्या सुमारास घडली...

Pune: स्कूल व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ला; वाघोलीतील बीजेएस कॉलेज जवळील घटना
आव्हाळवाडी (पुणे) : व्हॅन मालकासोबत न्यायालयात गेल्याचा राग मनात धरून स्कूल व्हॅन चालकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी कोयत्याच्या साहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाघोलीतील बकोरी फाटा येथे बीजेएस कॉलेजजवळ सकाळी नऊच्या सुमारास घडली. हल्ल्यामध्ये व्हॅनच्या काचा फुटल्या असून व्हॅनमध्ये आठ विद्यार्थी होते. परंतु सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी सचिन इंगोले (वय २७, रा. वाघोली) या व्हॅन चालकाने फिर्याद दिली असून हल्ला करणाऱ्या अल्पवयीन तरुणासह आकाश तोरंभे (रा. वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मोहन कदम हा व्हॅन मालक आहे. त्याच्याकडे इंगोले हा चालक म्हणून काम करतो. कदम यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची ६ मार्च २०२४ रोजी न्यायालयात तारीख होती. इंगोले हा कदम यांच्यासोबत न्यायालयात गेला होता. न्यायालयात का गेला याचा राग मनात धरून त्याने मित्राच्या साहाय्याने स्कूलमधून व्हॅन निघाल्यानंतर चालकावर कोयत्याच्या साहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पुढे बसलेल्या विद्यार्थ्याला ही काच लागून तो किरकोळ जखमी झाला.
या प्रकाराने घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. यानंतर हे हल्लेखोर पळून गेले. या प्रकाराने व्हॅनमधील विद्यार्थी घाबरले होते. ही घटना कळताच पालक शाळेत पोहोचले व मुलांना घरी नेले. भर दिवसा रस्त्यावर हा हल्ल्याचा प्रकार घडला. व्हॅनमध्ये असणारी मुले ५ वी ते ९ वी वर्गातील होती. यामध्ये दोन मुलींचाही समावेश होता. या घटनेने पालक वर्गातही चिंतेची बाब पसरली आहे.