एसबीआय ग्राहकाची रोकड लांबवणारे गजाआड, आरोपींनी केली रकमेची वाटणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 22:48 IST2017-12-03T22:48:03+5:302017-12-03T22:48:47+5:30
पुणे : बाणेर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एका ग्राहकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड असलेली बॅग लंपास करणा-या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे.

एसबीआय ग्राहकाची रोकड लांबवणारे गजाआड, आरोपींनी केली रकमेची वाटणी
पुणे : बाणेर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एका ग्राहकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड असलेली बॅग लंपास करणा-या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. आरोपींकडून २ लाख ७३ हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकल्स जप्त करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.
प्रमोद व्यंकटेश तेलगु (वय १९), उमेश आदिनारायण बोया (वय १९), योगेश धनराज द्रविड (वय २२, तिघेही रा. शितळानगर, देहुरोड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कदम (वय ३०, रा. भुजबळ चौक, वाकड) हे शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते बाणेर येथील एसबीआय आणि एचडीएफसी बँकेत पैसे भरायला जात होते. त्यांच्या बॅगमध्ये ३ लाख २३ हजार १०७ रुपये होते. ते बँकेत जात असताना अरिया टॉवर्सच्या गल्लीमध्ये मोटारसायकलवरुन आलेल्या तीन आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण करुन केल्यास बॅग लंपास केली होती.
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस गस्त घालीत असताना ताथवडे येथे त्यांना मोटारसायकलवरुन तीन जण संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. त्यांना पोलिसांनी निरखून पाहिले असता गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल क्रमांक आणि आरोपींच्या मोटारसायकलचा क्रमांक एकच असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी गाडी आडवी घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पुढील तपास सुरु आहे. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.