सवाई गंधर्व महोत्सवात ‘रसिका तुझ्याचसाठी’ सुरांनी जिंकली मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 03:32 IST2018-12-13T03:31:51+5:302018-12-13T03:32:09+5:30
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वातला एक ‘अभिजात’ स्वर आसमंतात गुंजला अन त्या समृद्ध करणाऱ्या सुरांनी मैफलीचा कळसाध्याय गाठला.

सवाई गंधर्व महोत्सवात ‘रसिका तुझ्याचसाठी’ सुरांनी जिंकली मने
पुणे : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वातला एक ‘अभिजात’ स्वर आसमंतात गुंजला अन त्या समृद्ध करणाऱ्या सुरांनी मैफलीचा कळसाध्याय गाठला. ती अद्वितीय जादू होती पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या सुरांची. रसिकांच्या हृदयाला ते स्वर भिडत गेले अन् त्या स्वरामध्ये रसिक हरवून गेले. ‘रसिका तुझ्याचसाठी’ या मराठमोळ्या भावगीताने रसिकांचा सवाईचा पहिला दिनु संस्मरणीय ठरला.
स्वरमंचावर बेगम परवीन सुलताना यांच्या आगमनाची रसिक आतुरतेने वाट पाहात होते. मात्र त्यांना मंचावर येण्यास काहीसा विलंब लागला. त्यांना साथसंगत करणारा तबलजी वाहतूककोंडीत अडकल्यामुळे उशीर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र काही क्षणातच त्यांचे स्वरमंचावर पाऊल पडताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. उत्तरार्ध ज्येष्ठ गायिकेच्या अभूतपूर्व स्वरांनी समृद्ध केला.
उस्ताद इक्रमुल मजीद यांच्याकडून प्रारंभीचे आणि त्यानंतर गुरू उस्ताद महंमद दिलशाद खान यांच्याकडून संगीताचे धडे गिरवलेल्या बेगम परवीन सुलताना यांची अभिजात गायकी कानसेनांना श्रवणीयतेची सुखद अनुभूती देऊन गेली. तबल्यावर त्यांना मुकुंदराज देव, हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य, तानपुºयावर शागा सुलतान खाँ, विद्या जाई आणि सचिन शेटे यांनी साथसंगत केली.
प्रसाद खापर्डे यांचे सवाईतील प्रथम सादरीकरण अत्यंत आश्वासक ठरले. केदार रागातील द्रुत लयीतील ‘कान्हा रे’ ही बंदिश त्यांनी सादर केली. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या नवोदित कलाकाराचे कौतुक केले. हिंदीमधील ‘राम राम राम भजो भाई’ या भजनाने त्यांनी मैफलीची सांगता केली. तबल्यावर त्यांना रामदास पळसुले, हार्मोनिअमवर मिलिंद कुलकर्णी, तानपुºयावर हृषीकेश शेलार आणि शिवाजी चामदर यांनी साथसंगत केली.
आजचे संगीत ऑनलाइन ‘रेडीमेड’
गुरूंकडे संगीत शिकताना ते कधी शिकवतील याकडे लक्ष लागलेले असायचे. सगळे त्यांच्या मूडवर होते. मात्र आजचे संगीत आॅनलाइन ‘रेडीमेड’ झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी नवोदितांचे कान टोचले. संगीत ही करणी विद्या आहे. त्यासाठी मेहनतीची आवश्यकता आहे. गुरूला चांगला शिष्य किंवा शिष्याला चांगला गुरू मिळाला तरच परंपरा टिकेल. स्वत:ला कधी धोका देऊ नये एकेक सरगम कंठातून यायला दोन ते तीन वर्षे लागतात. आज ती तपश्चर्या कमी झाली असल्याची खंत बेगम परवीन सुलताना यांनी व्यक्त केली.