Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: ‘सवाई महोत्सवा’च्या स्वरयज्ञास प्रारंभ;पहिल्याच दिवशी रसिकांचा उत्तम प्रतिसाद

By श्रीकिशन काळे | Updated: December 19, 2024 09:10 IST2024-12-19T09:06:38+5:302024-12-19T09:10:16+5:30

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात २२ डिसेंबरपर्यंत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 Swarayajna of Sawai Mahotsav begins; Great response from fans on the first day | Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: ‘सवाई महोत्सवा’च्या स्वरयज्ञास प्रारंभ;पहिल्याच दिवशी रसिकांचा उत्तम प्रतिसाद

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024: ‘सवाई महोत्सवा’च्या स्वरयज्ञास प्रारंभ;पहिल्याच दिवशी रसिकांचा उत्तम प्रतिसाद

पुणे : कलाकारांचे आणि 'सवाई'चे दृढ नाते आठवणींच्या रुपाने उलगडत, त्यांच्या आठवणींचा जागर करत ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला बुधवारी (दि.१८) रसिकांच्या उदंड प्रतिसादाने प्रारंभ झाला. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात २२ डिसेंबरपर्यंत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार आहे.

महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रारंभीच नुकत्याच दिवंगत झालेल्या उस्ताद झाकीर हुसेन, पं. रामनारायण आणि उस्ताद रशीद खाँ या जगविख्यात कलाकारांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी श्रीनिवास जोशी म्हणाले, ६ डिसेंबर १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळी झाकीरभाई असे एकमेव कलाकार होते, जे आवर्जून मुंबईहून पुण्याला महोत्सवासाठी आले होते. झाकीरभाईंनी सवाईच्या स्वरमंचावर ६० च्या दशकापासून कला सादरीकरण केले. ते सवाईशी सदैव कनेक्टेड होते. झाकीरभाई हे तबल्यापलीकडचे व्यक्तिमत्त्व होते. पं. भीमसेनजी आणि झाकीरभाईंचे वडील उस्ताद अल्लारखा यांचा विशेष स्नेह होता. तोच धागा झाकीरभाईंनी नेहमी जपला''.

रशीद खाँ यांच्याविषयी ते म्हणाले, पं. भीमसेनजींनी रशीदभाईंना कोलकत्ता येथे प्रथम ऐकले आणि लगेच सवाईत निमंत्रित केले. तेव्हा कलाकार रेल्वेने प्रवास करत असत. भीमसेनजी पेट्रोल भरायला बाहेर पडले आणि थेट रशीदभाईंना घेऊनच आले होते. ही आठवण रशीदभाई कायम सांगत असत. रशीदभाईंचे आणि जोशी कुटुंबाचे तसेच सवाईच्या परिवाराचे अनौपचारिक नाते होते.

पं. रामनारायण आणि पं. भीमसेनजी यांच्यात अजोड मैत्रीचा धागा होता. सारंगीचे भीष्माचार्य अशी त्यांची ओळख होती. त्यांनी साथ करण्याचे थांबवले असतानाही एकदा पं. भीमसेनजींच्या विनंतीवरून त्यांनी साथ केली होती. संगीतकार शंकर जयकिशन यांच्या विनंतीवरून वसंतबहार चित्रपटातील ''केतकी गुलाब जूही'' हे गाणे पंडितजी आणि पं. रामनारायण यांनी संगीतबद्ध केले होते, अशी आठवण श्रीनिवास जोशी यांनी सांगितली.
 
वत्सलाबाई जोशी पुरस्कार

एस. बालेश आणि डॉ. कृष्णा बालेश भ्रजंत्री यांच्या शहनाईवादनाने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा सुरेल प्रारंभ झाला. पं. राम देशपांडे यांनी आपल्या परिपक्व गायनातून जयपूर, आग्रा तसेच ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे दर्शन घडविले. त्यानंतर बागेश्री बहार या रागातील पं. व्ही. आर. आठवले ऊर्फ नादपिया यांची रूपक तालातील ''आयी बहार आयी'' ही रचना व द्रुत त्रितालातील रचना सादर केली. ''मनमोहन मेघश्यामा'' या समर्थ रामदास यांच्या भक्तिरचनेने त्यांनी वातावरण भक्तिरसमय केले.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी सवाई गंधर्वांचे नातू आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य स्वर्गीय पं. श्रीकांत देशपांडे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. श्रीकांत देशपांडे यांच्या पत्नी शीला देशपांडे, कन्या गौरी व जावई कौस्तुभ दिंडोरीकर, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, डॉ. प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, मुकुंद संगोराम उपस्थित होते. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकाराला वत्सलाबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात येते. 

Web Title: Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 Swarayajna of Sawai Mahotsav begins; Great response from fans on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.