सावित्रीच्या लेकींनी केला वडिलांचा अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST2021-03-15T04:12:20+5:302021-03-15T04:12:20+5:30
नीरा : मुलगा हा वंशाचा दिवा, तर मुलगी परधन मानणाऱ्या समाजात जुनाट रूढी-परंपरा आजही कायम असल्याचे चित्र आहे. ...

सावित्रीच्या लेकींनी केला वडिलांचा अंत्यविधी
नीरा : मुलगा हा वंशाचा दिवा, तर मुलगी परधन मानणाऱ्या समाजात जुनाट रूढी-परंपरा आजही कायम असल्याचे चित्र आहे. त्यातीलच एक परंपरा म्हणजे आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी मुलींनी न करता मुलानेच करायचा. मुलगा नसल्यास पुतण्या किंवा भावकीतील पुरुषाने अंत्यविधी करायचा. या सगळ्या परंपरांना फाटा देत, नीरेच्या बाबर कुटुंबाच्या पाच मुलींनी वडिलांच्या मृत्युपश्चात अंत्यविधी केला.
पुरंदर तालुक्यातील नीरा प्रभाग ३ मध्ये अशोक श्रीरंगराव बाबर (वय ७५) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी (दि. १२) निधन झाले. बाबर यांना पाच मुली आहेत. मुलगा नसल्याने अंत्यसंस्कार कोणी करायचा, हा प्रश्न निर्माण झाला. नातेवाइकांत कुजबुज सुरू झाली. नीरा येथील बाबर कुटुंबातील सदस्य, पै-पाहुणे व जावई अंत्यविधीसाठी तयार होते, पण आत्याच्या कन्या डॉ.ज्योती प्रवीण यादव व चिरंजीव बापू गायकवाड यांनी मुलींनीच अंत्यविधी करावा, असा विचार पुढे केला. धाकट्या मुलीने अंत्यविधी करण्यास हरकत नसावी, असा विचार पुढे आला. रोहिणी प्रकाश वाघ यांनी मुखाग्नी द्यावा, असे ठरले. घरापुढून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रेत त्या शिखाळ हतात घेऊन चालत गेल्या. नीरा बाजरपेठेतून अशी अंत्ययात्रा यापूर्वी नीरेच्या प्रभाग २मधील भुजबळ कुटुंबातील लेकींनी १० जुलै, २०१६ साली जाताना पहिली होती. नीरेच्या लेकींनी दुसऱ्यांदा अशा पद्धतीने वडिलांचा अंत्यविधी करताना पाहिले.
बाबर यांना पाच मुली सीमा प्रल्हाद मुळीक (रा. बारामती), सुवर्ण अर्जुन रायते (सणसर ता. इंदापूर), संगीता दत्तात्रय घोगरे (रा.गोपाळवाडी ता. दौंड), सारिका संभाजी मचाले (रा.जिरेगाव बारामती), रोहिणी प्रकाश वाघ (रा.काऱ्हाटी ता. बारामती) यांसह सर्व जावई व नातेवाईक उपस्थित होते.
अशोक बाबर यांच्या पत्नी स्वाती अशोक बाबर यांनी पती आजारी पडल्यावर व आधी मोठे कष्ट करून मुलींना उच्चशिक्षित केले. योग्य ठिकाणी विवाह करून दिले. गेली सहा वर्षे अशोक बाबर हे व्याधींनी आजारी होते. सलग पाच वर्षे ते घरीच अंथरुणावर होते. पाचही मुलींनी आळीपाळीने वडिलांची सेवा केली. पाचही मुलींच्या सासरकडचे कधीच त्यांना टोकत नव्हते. परंपरेकडे डोळसपणे पाहावे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांत आजही जुन्या रूढी-परंपरा तशाच आहेत. परंपरा पाळणे हा घटनेने दिलेला अधिकार असला, तरी परंपरेकडे डोळसपणे पाहिले पाहिजे, तसेच पुरुषप्रधान संस्कृती महिलाही कुठे मागे नाहीत, हे दाखवून दिले.