Pune: अस्वस्थ भाजपचा ‘सत्संग’, तर सैरभैर काँग्रेसचा ‘गोंधळ’

By राजू इनामदार | Published: November 23, 2023 10:28 AM2023-11-23T10:28:05+5:302023-11-23T10:34:11+5:30

शहरातील मुख्य लढत याच दोन पक्षांमध्ये होणार असली तरी उमेदवारच सापडत नसल्याने पक्षश्रेष्ठी झुंजी लावून देत सध्या तरी शांत बसलेले दिसत आहेत...

'Satsang' of restless BJP, 'confusion' of Sairbhair Congress pune latest news | Pune: अस्वस्थ भाजपचा ‘सत्संग’, तर सैरभैर काँग्रेसचा ‘गोंधळ’

Pune: अस्वस्थ भाजपचा ‘सत्संग’, तर सैरभैर काँग्रेसचा ‘गोंधळ’

पुणे : देशात सुरू झालेला लोकसभा निवडणुकीचा फिवर पुण्यातही पोहाेचला आहे. विरोधी वाऱ्याने अस्वस्थ झालेल्या भारतीय जनता पक्षाने सत्संगाचा आधार शोधला आहे; तर गटबाजी व केंद्रीय नेतृत्वाच्या नको असलेल्या शेरेबाजीने सैरभैर झालेल्या काँग्रेसमध्ये कसलाच ताळमेळ राहिलेला दिसत नाही.

शहरातील मुख्य लढत याच दोन पक्षांमध्ये होणार असली तरी उमेदवारच सापडत नसल्याने पक्षश्रेष्ठी झुंजी लावून देत सध्या तरी शांत बसलेले दिसत आहेत. या दोन मुख्य पक्षांची एकूण राजकीय स्थिती लक्षात घेत त्यात आपले काही साधले जाईल का, या विचारात आम आदमी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा काही पक्षांचे शहरातील नेतेही तयारीला लागले आहेत.

भाजप अन् काँग्रेसच मुख्य

सन १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून पुणे शहर लोकसभा मतदारसंघ प्रजा समाजवादी, संयुक्त समाजवादी, जनता पक्ष यांचा अपवाद वगळता काँग्रेसकडेच आहे. काकासाहेब गाडगीळ, ना.ग. गोरे, (प्रजा समाजवादी) शंकरराव मोरे, एस.एम. जोशी, (संयुक्त समाजवादी), मोहन धारिया (जनता पक्ष), विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, त्यानंतर विठ्ठल तुपे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र काँग्रेसचा पडता काळ सुरू झाला. आधी प्रदीप रावत, मग अनिल शिरोळे व नंतर गिरीश बापट अशा सलग निवडणुका जिंकत भाजपने आता या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

भाजप इच्छुकांची मोर्चेबांधणी :

काॅंग्रेस वर्चस्वाला धक्का बसेल, असा वास येताच भाजपची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. उमेदवार कोणीही असो, मतदारसंघ ताब्यात राहिलाच पाहिजे, म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी सत्संग आयाेजित करण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचा आधार घेतला जात आहे. पक्षश्रेष्ठींनी या मतदारसंघात किमान तीन जणांना उमेदवारीचा शब्द दिला आणि तयारीला लागण्याचे आदेशही दिले. त्यामुळेच माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेत, राज्यस्तरीय नेत्यांना निमंत्रण देत नाव गाजवण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पसंतीचे सुनील देवधर हेही मागील काही दिवसांपासून पुण्यात सक्रिय झालेले दिसत आहेत. ते इशान्य भारतात संघाचे काम करत असले तरी मूळचे पुण्याचेच आहेत.

काँग्रेसचे असू शकते धक्कातंत्र :

पुण्यातील काँग्रेस मात्र गटबाजीने सैरभैर झालेली दिसत आहे. त्यांचे याआधीचे तीन वेळाचे लोकसभेचे उमेदवार माजी आमदार मोहन जोशी हे या वेळीही स्पर्धेत आहेत. पक्षाच्या केंद्रीय तसेच राज्यातील नेत्यांचे निकटचे संबंध ठेवत, परराज्यांमधील निवडणुकाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आपले नाव आघाडीवर राहील याची काळजी त्यांनी घेतली आहे. त्याशिवाय पक्षाचे प्रदेश सरचिटणीस असलेले ॲड. अभय छाजेड हेही रेसमध्ये आहेत. ज्यांच्या घराण्याचे या मतदारसंघावर काँग्रेसच्या माध्यमातून वर्चस्व होते त्या गाडगीळ घराण्यातील माजी आमदार अनंत गाडगीळ हेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्याशिवाय कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून देणारे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याही गळ्यात ऐनवेळी उमेदवारीची माळ पडू शकते.

आप, मनसेचीही तयारी :

काँग्रेसने उमेदवारीबाबत अद्याप कोणाला शब्द वगैरे दिलेला दिसत नाही, मात्र त्यांच्याकडून सध्या आहेत त्या इच्छुकांशिवाय पक्षाबाहेरच्या एखाद्या उमेदवाराचे नावही जाहीर होऊ शकते. भाजप विरोधी वाऱ्याचा फायदा होईल, असे त्यांच्या नेत्यांना वाटते, मात्र त्यासाठी मुळात संघटना मजबूत लागते, याकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले दिसते आहे. दुसरीकडे भाजपची संघटना मजबूत आहे, मात्र उमेदवारीच अनिश्चित असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. या निवडणुकीआधीच्या धुमश्चक्रीत झालाच तर फायदा होईल म्हणून आम आदमी पार्टी व मनसेही आपले पत्ते रिंगणात फेकण्याच्या तयारीत आहेत. आमचाही उमेदवार असेल, आम्हीही निवडणूक लढवू, असे त्यांचे नेते सांगत आहेत.

शिवसेना-राष्ट्रवादीतील फुटीचा परिणाम :

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांमध्ये पडलेल्या फुटीचा परिणामदेखील पुणे लोकसभा निवडणुकीवर होणार आहे. दोन्ही गटात शहरातील स्थानिक बडे नेते विभागले गेले आहेत. अजित पवार गटाच्या शहरातील शक्तीचा फायदा होईल, असे भाजपला वाटत आहे, तर खुद्द शरद पवारच बरोबर असल्याने काँग्रेसला तेच चांगले उपयोगी पडतील, अशी खात्री वाटते आहे. शिवसेनेचेही तसेच आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने मागच्या वर्षभरात संघटन वाढवले आहे, तर कट्टर शिवसैनिक कधीच त्यांना साथ देणार नाहीत, असे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी सांगत आहेत.

Web Title: 'Satsang' of restless BJP, 'confusion' of Sairbhair Congress pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.