- किरण शिंदेपुणे - भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी आणि तितकीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ (वय ४५) हिला अटक केली आहे. पत्नी मोहिनी हिनेच सतीश वाघ हिनेच हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मोहिनीचा सहभाग उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अखेर आज सायंकाळी तिला अटक केली आहे.
९ डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचे पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. सतीश वाघ पहाटे साडे सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर शेवरलेट एन्जॉय या कारमधून त्यांचे अपहरण केले. नंतर गाडी शिंदवणे घाटाच्या दिशेने नेण्यात आली. अपहरण केल्यानंतर चालत्या गाडीतच त्यांचा तीक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाणकरून व गळा दाबून खून करण्यात आला. थेट गाडी शिंदवणे घाटात नेली. नंतर तेथे एकाठिकाणी मृतदेह टाकून पुन्हा परत गाडी आली.
दरम्यान या खून प्रकरणात खून पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली होती. त्यामध्ये वाघ यांच्या घराजवळच राहणाऱ्या एका आरोपीचाही समावेश आहे. सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आल्याचे निष्पन्नही झाले होते. याप्रकरणी एकूण पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सतीश वाघ यांच्या पत्नीचे नाव समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी मोहिनी सतीश वाघ यांच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर ती देखील या गटात सहभागी असलेल्या समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
सतीश वाघ हे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत. शेतकरी असलेल्या सतीश वाघ यांची हडपसर परिसरातील मांजरी भागात शेती आहे. याशिवाय हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं असं अचानक अपहरण झाले होते. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पुणे शहरापासून ३५ किलोमीटर अंतर असलेल्या शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या शरीरावर तब्बल ७२ वार होते.