माऊलींच्या पालखीला घडले नीरा स्नान, सातारा जिल्ह्यात पालखीचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 04:25 PM2019-07-02T16:25:47+5:302019-07-02T18:44:12+5:30

'ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम' माऊली, माऊलीच्या जयघोषात नीरा नदीच्या घाटावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.

Sant dnyaneshwar Mauli's palkhi in the Satara district | माऊलींच्या पालखीला घडले नीरा स्नान, सातारा जिल्ह्यात पालखीचे स्वागत

माऊलींच्या पालखीला घडले नीरा स्नान, सातारा जिल्ह्यात पालखीचे स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्देफडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदुंगांचा गजर आणि हरिनामात, हरिभजनात वारकरी तल्लीनउद्या चांदोबाबा लिंब येथे पाहिले रिंगण होणार

- अमोल अवचिते-  

लोणंद : सत्यगुराये कृपा मज केली ! 
            परी नाही घडली सेवा कांही! 
            सांपडविले वाटे जाता गंगास्नाना! 
            मस्तकी तो जाणा ठेविला कर ! 
'ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम' माऊली, माऊलीच्या जयघोषात नीरा नदीच्या घाटावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी हजारो संख्येने वैष्णवजनांनी गर्दी केली होती. नीरा येथे विसावा घेऊन शाही स्नानानंतर मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात माउलींच्या पालखीचे स्वागत झाले. 
    वाल्ह्याच्या मुक्कामा नंतर सकाळी माऊलींची पालखी पिंपरे खुर्द विहिरी येथे विसावा घेऊन नीरा नदीच्या तिरावर विसाव्याला अकरा वाजता पोहचली. दुपारी दोन वाजता माऊलींच्या जयघोषात शाही स्नान घालण्यात आले. पालखी संध्याकाळी सातच्या सुमारास  लोणंद येथे विसावली. 
     दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नानाच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. पादुकांना दत्त घाटावर आणताच फुलांचा वर्षाव करण्यात आला.  नीरातीरावर शंखनाद सुरू झाला. 

फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदुंगांचा गजर आणि हरिनामात, हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माऊलींचा पालखी सोहळा भक्तरसात चिंब होऊन गेला होता. 
     पोलिस आणि एनएसएसच्या स्वयंमसेवकांनी गर्दी व्यवस्थापन केले. सुरक्षिततेसाठी दोन ड्रोन कॅमेऱ्याने टेहळणी केली जात होती. नदी तीरावर वारकऱ्यांनी स्नानासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच घाटावर भजन सुरू होते. वारकरी दुपारी जेवण नदी तीरावर करीत होते. स्थानिक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
        सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी व्यवस्था केली होती.
दत्त घाटावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती. महाबळेश्वर ट्रेकर्स कडून नीरा नदीत सुरक्षिततेसाठी बोट ठेवण्यात आली होती.  
................... 
  कांद्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणंद नगरीत पालखीचे स्वागत करण्यात आले. लोणंद नगरीच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी बुधवारी (आज) दुपारी एक नंतर निघणार असून बुधवारी (उद्या ) चांदोबाबा लिंब येथे पाहिले रिंगण होणार आहे. त्यानंतर तरडगाव येथे  मुक्कामी असणार आहे.

Web Title: Sant dnyaneshwar Mauli's palkhi in the Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.