आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून आज (दि.१९) तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. रात्री आठनंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. साधारण रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास माऊलींची पालखी मंदिराच्या मुख्य महाद्वारातून प्रदक्षिणासाठी बाहेर पडेल. तत्पूर्वी, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट व प्रशासन भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण आळंदीनगरी भक्तिमय झाली आहे. माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. सुमारे तीन ते चार लाखांहून अधिक भाविक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. दरम्यान आळंदीत हरिनामासह ''ज्ञानोबा तुकारामांचा'' अखंड जयघोष सुरू आहे. येथील इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांची सुरक्षा लक्षात घेता पोलीस प्रशासनाने संपूर्ण शहरात एक हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. गुरुवारची नित्यनियमाची माऊलींची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी प्रस्थान होईल. टाळ - मृदुंगाच्या निनादात मंदिर व शहर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम होईल.
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 10:02 IST