"माऊली - माऊलीं"च्या जयघोषात संजीवन समाधी दिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 03:47 PM2020-12-13T15:47:37+5:302020-12-13T16:04:08+5:30

Alandi News : भावपूर्ण वातावरणात श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा रविवारी ‘माऊली - माऊली’च्या जयघोषात उत्साहात पार पडला. 

Sanjeevan Samadhi Ceremony Sant dnyaneshwar palkhi alandi | "माऊली - माऊलीं"च्या जयघोषात संजीवन समाधी दिन साजरा

"माऊली - माऊलीं"च्या जयघोषात संजीवन समाधी दिन साजरा

googlenewsNext

भानुदास पऱ्हाड -

आळंदी : पाहूनी समाधीचा सोहळा ! 
               दाटला इंद्रायणीचा गळा !! बाळ सिद्ध पाहता चिमुकला !
               कुणी गहिवरे कुणी हळहळे !
               भाळी लावून चरण रजाला चरणावरी लोळला !!
               चोखा गोरा आणि सावता !
               निवृत्ती हा उभा एकटा !
               सोपानासह उभी मुक्ता आश्रपूर लोटला !!  

“ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम”.... असा संजीवन सोहळ्याच्या  कीर्तनातील जयघोष... दुपारचे बारा वाजले... घंटानाद झाला... समाधीवर पुष्पवृष्टी... संत नामदेव महाराज व माऊलींची भेट... आणि मर्यादित उपस्थित भाविकांचे पाणावलेले डोळे...  अशा भावपूर्ण वातावरणात श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा रविवारी (दि.१३) ‘माऊली - माऊली’च्या जयघोषात उत्साहात पार पडला. 

तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक व दुधआरती घालून पहाटेच्या सुमारास प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सकाळी विना मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. सकाळी दहाला संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे कीर्तन सुरू झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. घंटानाद, अभिषेक आणि माऊलींच्या समाधीवर विविध फुलांची पुष्पवृष्टी करून आरती घेण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांच्यामार्फत विना मंडपातून करंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभार्यात माऊलींच्या समाधीच्या पुढे विराजमान करून माऊली नामाचा जयघोष करण्यात आला.

 याप्रसंगी प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विकास ढगे - पाटील, योगेश देसाई, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया, वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, नीता खरडे - पाटील, सचिव अजित वडगावकर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, माऊली गुळुंजकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदिंसह मानकरी, पदाधिकारी, सेवेकरी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

संत श्री. नामदेव महाराजांच्या वंशजांनी त्यांच्या पादुकांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून जयजयकार करत अलंकापुरीचा निरोप घेतला. “माऊली - माऊली” जयघोष करीत चोपदारांच्या वतीने माऊलींच्या पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घालून रात्री उशिरा ‘श्रीं’च्या गाभार्यात देवस्थानच्या वतीने नारळ - प्रसाद वाटून त्रयोदशीची सांगता झाली. आज (दि.१४) रात्री छबिना कार्यक्रमाने संजीवन सोहळ्याची सांगता करण्यात येईल.

दरम्यान श्री. पांडुरंग पांडरुंग, संत पुंडलिकराय तसेच श्री क्षेत्र आळे येथील रेडा समाधी स्थळ पादुकांची माऊलींचरणी भेट झाली.

 

Web Title: Sanjeevan Samadhi Ceremony Sant dnyaneshwar palkhi alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.