संमेलन अध्यक्षपदाची जागा माझी नाही : डॉ. गणेश देवी; राजन खान यांनी घेतली मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:06 IST2018-02-14T14:47:30+5:302018-02-14T15:06:41+5:30
अक्षरमानव आणि अक्षरधाराच्या वतीने आयोजित ‘डॉ़ देवींच्या मनात काय आहे’ या कार्यक्रमात साहित्यिक राजन खान यांनी डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेतली.

संमेलन अध्यक्षपदाची जागा माझी नाही : डॉ. गणेश देवी; राजन खान यांनी घेतली मुलाखत
पुणे :आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलन ही चांगली जागा आहे. पण ती आपली जागा नाही... अशा शब्दांत ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याला नम्रपणे नकार दर्शविला. मात्र, यंदाच्या वर्षी पुण्यात जागतिक साहित्य संमेलन घेणार असून, विविध देशांमधून १५0 साहित्यिकांना आमंत्रित करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
अक्षरमानव आणि अक्षरधाराच्या वतीने आयोजित ‘डॉ़ देवींच्या मनात काय आहे’ या कार्यक्रमात साहित्यिक राजन खान यांनी डॉ. गणेश देवी यांची मुलाखत घेतली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून खान यांनी त्यांना छेडले असता त्यांनी प्रांजळपणे ती आपली जागा नसल्याचे सांगत प्रश्नाला बगल दिली, परंतु स्वत: जागतिक साहित्य संमेलन भरविणार असल्याचे जाहीर केले.
तेजगडमध्ये आदिवासींसाठी कार्य करण्याच्या उद्देशाविषयी भाष्य करताना ते म्हणाले, १९२0 पर्यंत राजकीय नेत्यांना आदिवासी कोण हे माहीत नव्हतं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सरकार म्हणाले, आदिवासींना त्यांचे त्यांचे जगू द्या, तर एनडीए सरकार म्हटले त्यांना मुख्य प्रवाहात आणायला हवं. अरे, पण आदिवासींना तरी कुणीतरी विचारायला नको का की त्यांना कुठं जायचंय? हे कुणीच केले नसल्याने आम्हीच त्यांना विचारायचं ठरवलं. आज आदिवासी भागांमध्ये हातात बंदुका घेऊन नक्षलवादी आपली प्रगती करू इच्छित आहेत;
पण हिंसा हा प्रगतीचा पाया होऊ शकत नाही. अहिंसक मार्गानेच हा लढा लढावा लागणार आहे.