प्रामाणिकपणाला सलाम! बँकेच्या कॅशिअरकडून जादाचे एक लाख रूपये आले; प्रयोगशाळा सहाय्यकाने ते परत केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 18:23 IST2021-07-01T18:21:36+5:302021-07-01T18:23:26+5:30
भिकोबानगर (ता. बारामती) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील कॅशियरकडून चुकून आलेले जादाचे एक लाख रुपये परत देण्यात आले.

प्रामाणिकपणाला सलाम! बँकेच्या कॅशिअरकडून जादाचे एक लाख रूपये आले; प्रयोगशाळा सहाय्यकाने ते परत केले
सांगवी : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कॅशियरकडून नजरचुकीने जास्तीची आलेली एक लाख रुपयांची जादा रक्कम परत करून मानाजीनगर येथील एका प्रयोगशाळा सहाय्यकाने प्रामाणिकपणाचा दर्शन घडविले आहे. राहुल यशवंत जगताप असे या व्यक्तीचे नाव असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
भिकोबानगर (ता. बारामती) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील कॅशियरकडून चुकून आलेले जादाचे एक लाख रुपये परत देण्यात आले. जगताप हे मानाजीनगर येथील रहिवासी असून पणदरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालयात ते प्रयोग शाळा सहायक आहेत. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे. राहुल जगताप यांचे भिकोबानगर येथील जिल्हा बँकेच्या शाखेत खाते आहे. सोमवारी (दि. २८) जगताप यांनी त्यांच्या घरातील इतर सदस्यांच्या खात्यामधील ३ लाख ५०० रुपये काढण्यासाठी बँकेत गेले होते. यावेळी बँकेचे कॅशिअर यांच्याकडून राहुल जगताप यांना चुकून ४ लाख ५०० रुपये दिले गेले. जगताप नजीकच्या पणदरे येथील सिद्धेश्वर पतसंस्थेत गेले होते. दरम्यान त्यांनी बँकेतून आणलेली रक्कम मोजली असता त्यामध्ये जास्तीचे एक लाख रुपये आल्याचे लक्षात आले. त्यामुळे जगताप यांनी विनोद जगताप यांना सोबत घेत अधिकची आलेली रक्कम पुन्हा जिल्हा बँकेच्या कॅशिअर गणेश खुडे,सुभाष जगताप यांना सुपूर्द केली.आपल्या हातून चुकून गेलेल्या व परत मिळालेल्या रकमेमुळे कॅशिअरनेे देखील सुटकेचा निःश्वास सोडला.