"राज्यातील तिघाडी सरकार केवळ सत्ता उपभोगण्यात दंग, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 20:32 IST2023-10-10T20:31:30+5:302023-10-10T20:32:49+5:30
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रदीप दोडके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये प्रवेश केला...

"राज्यातील तिघाडी सरकार केवळ सत्ता उपभोगण्यात दंग, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर"
पुणे : ‘राज्यातील तिघाडी सरकार केवळ सत्ता उपभोगण्यात दंग आहे. आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यूचे सत्र सुरूच असून, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर गेली आहे. अशा वेळी महाराष्ट्राला केवळ सत्ताधारी नेतृत्व नको, तर राज्याचा कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी केले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रदीप दोडके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना अहिर बोलत होते. जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, शहर समन्वयक बाळा ओसवाल, विस्तारक राजेश पळसकर, युवा सेना विस्तारक नीलेश बडदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.