धावता धावता कॅन्सरवर मात करण्याची 'मनीषा' केली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 03:42 PM2019-01-19T15:42:15+5:302019-01-19T15:47:34+5:30

कॅन्सर झाला म्हटलं की, प्रत्येकाला धडकी भरते. कॅन्सरवरदेखील मात करता येते, त्यासाठी हवी जिद्द आणि त्याच्याशी लढण्याची ऊर्जा. असाच लढा ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या डॉ. मनीषा डोईफोडे यांनी दिला आणि कॅन्सरला पळवून लावले.

Running helps women to out of 'cancer' | धावता धावता कॅन्सरवर मात करण्याची 'मनीषा' केली पूर्ण

धावता धावता कॅन्सरवर मात करण्याची 'मनीषा' केली पूर्ण

Next

पुणे : कॅन्सर झाला म्हटलं की, प्रत्येकाला धडकी भरते. ज्याला झाला असेल, तो तर आपला आत्मविश्वासच गमावून बसतो. त्याचे कुटुंबीय देखील खचलेले असते;  परंतु या कॅन्सरवरदेखील मात करता येते, त्यासाठी हवी जिद्द आणि त्याच्याशी लढण्याची ऊर्जा. असाच लढा ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या डॉ. मनीषा डोईफोडे यांनी दिला आणि कॅन्सरला पळवून लावले. खरंतर कॅन्सरशी लढताना त्यांनी धावणे सोडले नाही. हे धावणेच त्यांना ऊर्जा देत असे आणि जगण्याची उमेद. त्याचबरोबर कॅन्सरशी दोन हात करण्यासाठी ताकदही मिळायची. कॅन्सर होऊनही त्यांनी धावणे सोडले नाही. या धावण्यामुळे आज त्या ठणठणीत झाल्या आहेत. नवनवीन मॅरेथॉन जिंकत आहेत. 

डॉ. मनीषा मंदार डोईफोडे यांना २०१५ मध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजले. सुरुवातीच्या स्टेजमध्ये हा कॅन्सर होता. त्यानंतर डॉक्टरांशी बोलून सर्जरी करण्याचे ठरविण्यात आले. किमोथेरपी, रेडियेशन हे उपचार सुरूच होते. याविषयी त्या म्हणाल्या, ‘जवळपास ८ महिने थेरपी चालली होती. तेव्हा मला माझ्या पतीने खूप आधार दिला. खरं तर लहानपणापासून खेळाची, धावण्याची आवड होती. त्यामुळे मी धावणे हे लहानपणापासून करायचे. कॅन्सर झाल्याचे समजल्यानंतर मी घरात बसून होते. तेव्हा पतीने मला धावायला प्रोत्साहित केले. तसेच डॉक्टरांनीदेखील काहीच हरकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मी हळूहळू धावायला सुरुवात केली. अगोदर जेवढे जमेल तेवढे धावायचे. त्यानंतर मग माझा आत्मविश्वास खूप वाढला. धावल्यामुळे आॅक्सिजन वाढतो. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. सर्व शरीरातील प्रक्रिया सुरळीत चालतात. त्याचा फायदा मला माझ्या आजारावर मात करण्यासाठी होऊ लागला. आजार झाल्यानंतर माझी मन:स्थिती खूप ढासळलेली होती. पण माझ्या पतीने, डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी आणि पुणे रनर ग्रुपने मला खूप आधार दिला. मी पुणे रनर ग्रुपसोबत धावू लागले. 

 दर शनिवारी आणि रविवारी हा ग्रुप सावित्रीबाई पुणे विद्यापीठात एकत्र यायचा. तेव्हा मला फक्त येऊन बसायला सांगितले. तुला धावायचे असेल तर हळूहळू धाव, असे ग्रुपच्या मेंबर्सनी सांगितले. मग मी सकाळी विद्यापीठात जाऊ लागले.  रनिंग सुरूच ठेवले. माझी थेरपी संपल्यानंतर मी हैदराबादला हाफ मॅरेथॉनसाठी गेले. तेव्हा मी २१ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला. त्यानंतर आता २०१८ मध्ये ४२ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करून दाखवली. 

 आता येत्या रविवारीदेखील मी २१ किलोमीटर धावणार आहे. खरंतर धावल्यामुळे माझा आत्मविश्वास परत मिळाला. प्रत्येक स्त्रीने दररोज अर्धा तास, तरी धावले पाहिजे. त्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कामे तर सर्वांनाच असतात, पण त्यामधून अर्धा तास आपल्या आरोग्यासाठी काढून धावावे. 

सोसायटीतील लहान-थोर धावतात 

आमच्या सोसायटीचे नाव अलोमा आहे. त्यामुळे आम्ही सोसायटीमध्ये मॅरेथॉन आयोजित करतो. गेल्या सहा वर्षांपासून सोसायटीत हा उपक्रम घेत आहोत. त्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी होतात. आरोग्यासाठी धावणे चांगले असल्याने हा संदेश आम्ही देतो. खरंतर अनेक लोकांना आपण धावू शकतो, हा विश्वास नसतो. परंतु, त्यांनी हळूहळू सुरुवात करून धावायला हवे, असे डॉ. मनीषा डोईफोडे यांनी सांगितले.पुणे रनर ग्रुपतर्फे मॅरेथॉनचे प्लॅन आयोजित केले जातात. ते आमच्या आठवड्याचे प्लॅनिंग करतात. आठवड्यातून दोन दिवस धावायचे आणि इतर दिवशी योगा, सायकलिंग, पोहणे, ट्रेकिंग असे छंद जोपासायचे. यातून आरोग्य तर चांगले राहतेच; पण मनाला एक आनंददायी भावना मिळते. 

Web Title: Running helps women to out of 'cancer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.