थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाची धावपळ; पुणे महापालिकेतर्फे विशेष पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:37 IST2018-01-12T13:34:32+5:302018-01-12T13:37:07+5:30
विविध विकासकामे करण्यासाठी मिळकतकर हाच पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो; परंतु यंदा अपेक्षित तेवढा मिळकत कर वसुल न झाल्याने मार्च अखेरजवळ आल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाची धावपळ; पुणे महापालिकेतर्फे विशेष पथके
पुणे : शहरामध्ये विविध विकासकामे करण्यासाठी मिळकतकर हाच पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो; परंतु यंदा अपेक्षित तेवढा मिळकत कर वसुल न झाल्याने मार्च अखेरजवळ आल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
सन २०१७-१८साठी तब्बल १ हजार ४०० कोटींचा मिळकत कर वसूल करण्याचे उद्दिष्ट असताना आता पर्यंत केवळ ८९१ कोटी ८६ लाखांचा मिळकतकर वसूल झाला आहे. मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष कर वसुली पथकांची नियुक्ती केली आहे.
थकीत कर वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई सुरू केली असून, गेल्या दहा दिवसांत १५ कोटी ८४ लाख रुपयांचा थकीत कर वसूल करण्यात आला आहे. मार्च अखेर जवळ आल्याने मिळकतकराची अधिकाधिक थकबाकी वसूल करून पालिकेच्या तिजोरीत पैसे जमा करण्यासाठी पालिकेच्या मिळकतकर विभागाने थकबाकी वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. मिळकतकर विभागाने यासाठी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई सुरू केली आहे. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम अधिक तीव्र केल्याने दहा दिवसांतच तब्बल १५ कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. येत्या काही दिवस ही कारवाई अधिक कडक करण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत. पालिकेचा थकीत मिळकतकर भरावा, यासाठी पालिका प्रशासनाने अनेक योजना राबविल्या; मात्र त्यानंतरही अनेक मिळकतदारांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार योजना राबवूनदेखील याकडे दुर्लक्ष करून थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींना नोटीस पाठविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.
अंदाजपत्रकात ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतींचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचा निर्णय कर आकारणी व कर संकलन विभागाने घेतला आहे.