लातूर मनपाचा वीजपुरवठा तोडला, 11 कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 06:41 PM2018-01-10T18:41:14+5:302018-01-10T18:41:32+5:30

वीजबिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने लातूर मनपाचा वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे शहर अंधारात असून, जवळपास ११ कोटींची थकबाकी मनपाकडे आहे.

Latur municipal power supply disrupted, 11 crores pending | लातूर मनपाचा वीजपुरवठा तोडला, 11 कोटींची थकबाकी

लातूर मनपाचा वीजपुरवठा तोडला, 11 कोटींची थकबाकी

googlenewsNext

लातूर : वीजबिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने लातूर मनपाचा वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे शहर अंधारात असून, जवळपास ११ कोटींची थकबाकी मनपाकडे आहे. चालू महिन्याचे २१ लाखांचे बिलही थकले आहे. मुदतीत बिल न भरल्यामुळे महावितरणने लातूर मनपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

लातूर मनपाकडे २०११ पूर्वीचे ९ कोटी रुपये वीजबिल थकित असून, एकूण ११ कोटी रुपये वीजबिलाचे थकले आहेत. दरमहा स्ट्रीट लाईटचे साधारणपणे २० ते २१ लाख वीजबिल येते. तर कार्यालय व अन्य कनेक्शनचे ४ ते ५ लाखांचे वीजबिल येते. २०११ पूर्वीचे स्ट्रीट लाईटचे ९ कोटी रुपये थकले आहेत. या थकबाकीचा भरणा करण्यासाठी मनपा व महावितरणमध्ये करार होऊन दरमहा १८ लाखांचा हप्ता करून देण्यात आला आहे. मात्र करारानुसार हप्ता भरला जात नाही. शिवाय, चालू बिलही थकविले जात आहे. त्यामुळे महावितरणने लातूर मनपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील शिवाजी चौक, खाडगाव रोड, गावभाग, बार्शी रोड, गंजगोलाई परिसर, नांदेड नाका, अंबाजोगाई रोड, औसा-अंबाजोगाई रोड परिसरातील पथदिवे मंगळवारी रात्रीपासून बंद आहेत. मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्मचारी व सफाई कामगारांचे वेतनही नियमित होत नाही. त्यातच वसुली मोहीमही थंडावली आहे. त्यामुळे वीजबिल भरणा करावा की कर्मचाºयांचा पगार करावा, असा प्रश्न मनपा प्रशासनासमोर आहे. उत्पन्नाचे स्त्रोत मजबूत नसल्यामुळे दर महिन्याला ही समस्या उद्भवत आहे. वीजपुरवठा खंडित करून २४ तास उलटले तरी तडजोड झाली नव्हती. महावितरणही वीजबिलासाठी अडून बसल्याने मंगळवार आणि बुधवारची रात्र अंधारात काढावी लागली.
पाणीपुरवठा योजनेचीही थकबाकी...
पाटबंधारे विभागाच्या मांजरा प्रकल्पावरून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचीही थकबाकी मनपाकडे आहे. २ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी २० जानेवारीपर्यंत भरावी; अन्यथा सिंचन कायदा १९७६ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असे पत्र लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता आर. एन. क्षीरसागर यांनी लातूर मनपाला पाठविले आहे. महावितरणची आणि पाटबंधारे विभागाच्या थकबाकीमुळे मनपाची डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: Latur municipal power supply disrupted, 11 crores pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर