सत्ताधारी पक्षाकडून शेजारील प्रभागांतील अनुकूल मते आपल्या प्रभागात; मतदार याद्यांच्या मोडतोडीची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:26 IST2025-11-01T15:26:22+5:302025-11-01T15:26:36+5:30
सत्ताधारी पक्षातील काही इच्छुकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्याला अनुकूल असलेले शेजारच्या प्रभागातील मतदार आपल्या प्रभागात तर प्रतिकूल मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये ढकलल्याचा आरोप होत आहे.

सत्ताधारी पक्षाकडून शेजारील प्रभागांतील अनुकूल मते आपल्या प्रभागात; मतदार याद्यांच्या मोडतोडीची होणार चौकशी
पुणे: महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेवरून आरोपावरून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आता मतदार याद्यांमध्येही मोडतोड केल्याचे प्रकार समोर येत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून शेजारील प्रभागांतील अनुकूल मते आपल्या प्रभागात ओढण्यात आल्याची आणि प्रतिकूल मते दुसऱ्या प्रभागात ढकलण्यात आल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांपर्यंत आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मतदार याद्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत.
महापालिका सभागृह विसर्जित झाल्यानंतर तीन साडेतीन वर्षानंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवरून चांगलेच वादळ निर्माण झाले होते. विशेष म्हणजे प्रभागाची चुकीच्या पद्धतीने रचना केल्याच्या तक्रारी सत्ताधारी पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांनी करत स्वपक्षाच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. प्रारुप प्रभागरचनेत किरकोळ बदल करून निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. महापालिकेचे ४१ प्रभाग अंतिम झाले असून, येत्या ११ नोव्हेंबर रोजी या प्रभागांमधील आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनाचे काम सुरू आहे. महापालिकेची सुमारे ३६ लाख मतदारसंख्या ४१ प्रभागांनुसार विभागून मतदार याद्या निश्चित करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी आयुक्त नवलकिशोर राम यांनी दोन उपायुक्तांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक केली असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे.मात्र, या मतदार यादी विभाजन प्रक्रियेतही राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या तक्रारी येत आहेत. सत्ताधारी पक्षातील काही इच्छुकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्याला अनुकूल असलेले शेजारच्या प्रभागातील मतदार आपल्या प्रभागात तर प्रतिकूल मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये ढकलल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे काही प्रभागांतील मतदारसंख्या १ लाख २५ हजार ते १ लाख ५० हजारांपर्यंत वाढली आहे, तर काही प्रभागांमध्ये ती केवळ ६५ हजारांवर आली आहे. विशेषतः प्रभागाच्या सीमारेषेवरील मतदारांची नावे स्वतःच्या प्रभागात लावून घेण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत.
या तक्रारींची गंभीर दखल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतली आहे. त्यांनी मतदार यादी विभाजनाच्या कामाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सहाय्यक महापालिका आयुक्तांकडे प्रभागनिहाय इतर क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी सहाय्यक अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष सिमारेषा तपासून मतदार यादीतील नोंदींची शहानिशा करायची आहे. हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. यासाठी २८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदारयादी पदनिर्देशित अधिकारी रवी पवार यांनी त्याची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, मतदार याद्यांमध्ये गोलमाल झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कारावाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.