पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मंगळवारपासून (दि. ८) पन्नास टक्के क्षमतेने सुरू होत आहे. त्यामुळे कार्यालयातील कामांनादेखील ५० टक्के कोटा ठरविण्यात आला. यात विविध प्रकारचे वाहन परवाने व योग्यता प्रमाणपत्रांचा समावेश आहे. कोटा कमी झाल्याने वाहन परवान्यासाठी ‘वेटिंग’ सुरू होण्याची शक्यता आहे.
पूर्वी शिकाऊ परवान्यासाठी सातशे कोटा होतो. तो आता साडेतीनशे करण्यात आला. म्हणजे आता रोज केवळ साडेतीनशे जणांनाच शिकावू वाहन परवाना काढता येईल, तसेच पक्का परवानादेखील अर्ध्यावर करण्यात आला. यात दुचाकी, चारचाकी, कॅब आदींचा समावेश आहे. शिवाय क्रेन, ट्रॅक्टरचा कोटादेखील कमी केला आहे.
पूर्वी रोज ७५ रिक्षांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाई. आता ही संख्या साठ करण्यात आली आहे. अन्य वाहनांचा योग्यता प्रमाणपत्र कोटादेखील कमी केला असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले.