पुण्यात विधानसभेसाठी भाजपाकडे आरपीआयचाही दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 10:20 AM2019-09-06T10:20:54+5:302019-09-06T10:29:35+5:30

गेल्या काही वर्षात पुणे शहरात भाजपाला फार मोठे राजकीय यश मिळाले आहे..हे यश आरपीआय बरोबर युती झाल्यामुळेच मिळाले असा आरपीआय कार्यकर्त्यांचा दावा आहे.

RPI also claims to bjp for the seat of Assembly in pune | पुण्यात विधानसभेसाठी भाजपाकडे आरपीआयचाही दावा

पुण्यात विधानसभेसाठी भाजपाकडे आरपीआयचाही दावा

Next
ठळक मुद्देकॅन्टोन्मेट देता येत नसेल तर वडगाव शेरी किंवा शिवाजीनगर द्यावा असा पत्रात उल्लेखआरपीआयला पुण्यात हक्काची जागा निर्माण करून देण्याची ही भाजपाला संधी

पुणे : विधानसभेच्या पुण्यातील जागांबाबत शिवसेनेची समजूत कशी काढायची या पेचात भारतीय जनता पार्टीचे नेते असतानाच आता त्यांच्याबरोबर युतीत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षानेही विधानसभेची पुणे शहरातील किमान एक जागा तरी आम्हाला मिळावी अशी मागणी करून तिढा निर्माण केला आहे. पक्षाच्या पुणे शहर शाखेने तसा लेखी ठराव करून तो मुख्यमंत्री व भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे. 
महापालिकेत आरपीआयचे ५ नगरसेवक आहेत. ते सगळेच भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले असले तरीही त्यांनी आरपीआयचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. सत्तेतील सहभाग म्हणून भाजपाने त्यांना उपमहापौरपदही दिले आहे. त्याच आधारावर आता आरपीआयचे स्थानिक नेते विधानसभेची जागा मागत आहेत. वडगावशेरी, शिवाजीनगर व कॅन्टोन्मेंट असे तीन विधानसभा मतदारसंघ त्यांनी दिले असून त्यापैकी किमान एक तरी मिळावा असे त्यांचे म्हणणे आहे. या तीनपैकी कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघाबाबत हे नेते विशेष आग्रही आहे. हा विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे तिथे आमदार आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदावरून दूर करण्यात आले आहे. त्यामुळे तसेच मतदारसंघाच्या रचनेमुळे हाच मतदारसंघ मिळावा असे स्थानिक आरपीआय नेत्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षात पुणे शहरात भाजपाला फार मोठे राजकीय यश मिळाले आहे. विधानसभा, त्यानंतर लोकसभा, मग महापालिका यात भाजपाचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. महापालिकेत तर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळून एकहाती सत्ता आली. हे यश आरपीआय बरोबर युती झाल्यामुळेच मिळाले असा आरपीआय कार्यकर्त्यांचा दावा आहे. शहरातील ५ प्रभागांमध्ये आरपीआयचे नगरसेवक असले तरीही प्रत्येकच प्रभागात आरपीआयची लक्षणीय मते आहेत. ही सर्व मते भाजपा उमेदवारांच्या पारड्यात पडल्यामुळेच भाजपाला विजय मिळाला, त्याची परतफेड त्यांनी आता विधानसभा मतदारसंघ देऊन करावी असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 
कॅन्टोन्मेट देता येत नसेल तर वडगाव शेरी किंवा शिवाजीनगर द्यावा असे पत्रात म्हटले आहे. या दोन्ही मतदारसंघातील आरपीआय च्या मतांची संख्या लक्षणीय आहे. तसेच महापालिकेप्रमाणेच आरपीआयचे इच्छुक भाजपाच्या चिन्हावरच ही निवडणूक लढवणे पक्षाला मान्य आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले की आरपीआयला पुण्यात हक्काची जागा निर्माण करून देण्याची ही भाजपाला संधी आहे. आरपीआय ने भाजपाला आतापर्यंत बरीच राजकीय मदत केली. हक्काची मते त्यांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे त्यांनी आता आरपीआयची मागणी मान्य केली पाहिजे. त्यामुळे युती आणखी भक्कम होण्यास मदत होईल
..........
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही पक्षाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य केला आहे. विधानसभेसाठी आरपीआयला भाजपा ज्या जागा देणार आहे त्यात पुण्यातील एका जागेचा समावेश करावा असे त्यांनी मुख्यमंत्री तसेच भाजपा प्रदेशाध्यक्षांना कळवले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

Web Title: RPI also claims to bjp for the seat of Assembly in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.