ridge collapsed due to rain in Bhuleeshwar Ghat | भुलेश्वर घाटात अवकाळी पावसामुळे कोसळली दरड
भुलेश्वर घाटात अवकाळी पावसामुळे कोसळली दरड

ठळक मुद्देप्रवाशांनी केला रस्ता साफ : कोणतीही जीवितहानी नाही 

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर व दौंड तालुक्याला जोडणाऱ्या भुलेश्वर घाटात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे दरड कोसळून वाहतुकीला अडथळा आला. मात्र, या रस्त्याने येणाऱ्या प्रवाशांनी रस्त्यावरील दगड-गोटे बाजूला करून रस्ता मोकळा केला. यामुळे वाहतूककोंडी झाली नाही. रात्रीची दरड कोसळल्याने कोणतीही हानी झाली नाही. 
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्याकडे सासवड-यवत रस्त्याबरोबरच भुलेश्वर घाटाचीही दुरुस्ती करण्याची मागणी केली. या नागरिकांची मागणीची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंडळाकडून ५ कोटी ४० लाखाचा निधीही मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. यात भुलेश्वर घाटाचेही रुंदीकरण करण्यात आले. घाटाचे रुंदीकरण करताना डोंगर सरळ तोडण्यात आला. यामुळे उन्हात डोंगर गरम होऊन पावसाळ्यात भिजल्याने ठिकठिकाणी दरड कोसळत आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या चारीमध्ये डोंगराची दगड माती पडल्याने चारी बुजल्या आहेत. या परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येते. घाटाचे रुंदीकरण झाले, मात्र पुलांची कामे करण्यात आली नाहीत. नवीन पुलांचे पाइपही घाटात टाकले गेले. मात्र, आज त्या ठिकाणी पाईप दिसत नाहीत, मग हे पाईप नक्की गेले तरी कुठे? रस्ता दुरुस्त करण्याअगोदर अरुंद पुलांची कामे व्हायला हवी होती, मात्र याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. यामुळे आजही येथील अरुंद पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके म्हणाले, श्री क्षेत्र भुलेश्वर घाटातील मोठमोठे दगड पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेकदा दगड हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे मोठी यात्रा भरते. 

..........
यवतकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग 
भुलेश्वर घाटाच्या वर असणाऱ्या माळशिरस, टेकवडी, पोंढे यांना यवत या गावात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. घाटाच्या वरील बाजूला असणारे भुलेश्वर मंदिर पाहण्यासाठी शिल्पकला अभ्यासक, पर्यटक, भक्त या ठिकाणी  येत असतात. पुण्यापासून ७० किमीवर भुलेश्वर मंदिर आहे. यामुळे बहुतांशी भाविक भुलेश्वरी येण्यासाठी याच घाटाचा वापर करतात. 
.............


Web Title: ridge collapsed due to rain in Bhuleeshwar Ghat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.