सापडलेले मंगळसूत्र महिलेला केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 00:11 IST2019-02-07T00:10:49+5:302019-02-07T00:11:03+5:30
एका द्राक्षविक्रेत्याने आपला प्रामाणिकपणा दर्शवून सापडलेले अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र महिलेला परत करून समाजात आदर्श निर्माण केला आहे

सापडलेले मंगळसूत्र महिलेला केले परत
नारायणगाव : कलियुगातही माणुसकी असलेली माणसे खूप भेटतात. लोभी माणसांची कमीदेखील या जगात नाही. पावलोपावली अशी माणसे भेटतात; मात्र एका द्राक्षविक्रेत्याने आपला प्रामाणिकपणा दर्शवून सापडलेले अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र महिलेला परत करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील बाबासाहेब मुरलीधर भोर या द्राक्षविक्रेत्याचे प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
नारायणगाव येथील इंदुमती विजय गुंजाळ या भाजी घेण्यासाठी बाजारात आपल्या मोठ्या जाऊबाई अंजली जितेंद्र गुंजाळ यांच्यासोबत गेल्या होत्या. बाजारातून घरी गेल्यानंतर त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आले.
याचदरम्यान द्राक्षविक्रेते बाबासाहेब मुरलीधर भोर हे शिल्लक द्राक्षांचा कॅरेट रिकामा करीत असताना त्यांना त्यामध्ये मंगळसूत्र आढळून आले. त्यांनी लगेच मंगळसूत्र कोणाचे, हे विचारत संबंधित महिलेचा शोध सुरू केला. महिलेचा तपास न लागल्याने भोर पोलीस ठाण्यात मिळालेले मंगळसूत्र जमा करण्यास निघाले असता, वारुळवाडी येथील सबनीस विद्यामंदिरसमोर गुंजाळ फॅमिलीचे स्नेही दिलीप वारुळे, पप्पूशेठ जठार, नीलेश संते आणि घाडगे मामा हे काल (दि. ५) रात्री ८.३० वाजता मंगळसूत्राचा शोध घेत होते. भोर यांनी त्यांना ‘काय शोधताय?’ असे विचारले असता त्यांनी मंगळसूत्र हरविल्याचे सांगितले.
भोर यांनी मंगळसूत्र मिळाल्याचे सांगितले. भोर यांनी सापडलेले मंगळसूत्र इंदुमती विजय गुंजाळ
यांच्या हवाली केले. गुंजाळ यांना मंगळसूत्र मिळाल्याचा आनंद
गगनात मावेना. इंदुमती गुंजाळ व अंजली गुंजाळ यांनी भोर यांचे प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले आणि कौतुक करून त्यांना २ हजारांचे रोख बक्षीस दिले.