लोणावळा, मावळातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंध, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By नितीन चौधरी | Updated: June 11, 2025 19:34 IST2025-06-11T19:32:21+5:302025-06-11T19:34:53+5:30

पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध

Restrictions on tourist spots in Lonavala Maval pune District Collector orders for the safety of tourists | लोणावळा, मावळातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंध, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोणावळा, मावळातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंध, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : लोणावळा तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. वर्षाविहार तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिले आहेत.

लोणावळा परिसरातील एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या परिसरात पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, हे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध राहील.

पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध राहील.

महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे यंत्रणा वाजविणे, गाडीतील स्पीकर, वूफर मोठ्या आवाज वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करण्यास प्रतिबंध असेल. धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अनुमती असेल. या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लघंन केल्यास दंडनीय अथवा कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

Web Title: Restrictions on tourist spots in Lonavala Maval pune District Collector orders for the safety of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.