‘तेर’चे संशोधन सूत्रबद्ध पद्धतीने पुढे जावे : संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक अमोल गोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 12:46 PM2020-01-20T12:46:01+5:302020-01-20T12:50:45+5:30

तेर येथील संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे काम प्रगतिपथावर

The research of 'Ter' should proceed in a formulaic way | ‘तेर’चे संशोधन सूत्रबद्ध पद्धतीने पुढे जावे : संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक अमोल गोटे

‘तेर’चे संशोधन सूत्रबद्ध पद्धतीने पुढे जावे : संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक अमोल गोटे

Next
ठळक मुद्देकझिन्स या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या माध्यमातून तेरची संशोधनाची दारे खऱ्या अर्थाने झाली खुलीतेरच्या आजवरच्या उत्खननामध्ये बौद्धकालीन स्तूप, हस्तिदंताच्या बाहुल्या अशा अनेक वस्तू संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने असे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न गरजेचे

तेरचे प्राचीन नाव तगर असे होते. कझिन्स या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या माध्यमातून तेरची संशोधनाची दारे खऱ्या अर्थाने खुली झाली. तेर हे व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे केंद्र होते. तेरच्या आजवरच्या उत्खननामध्ये बौद्धकालीन स्तूप, हस्तिदंताच्या बाहुल्या अशा अनेक वस्तू मिळाल्या आहेत. तेर गावचे रहिवासी रामलिंगप्पा लामतुरे, त्यांचे चिरंजीव भागवतप्पा आणि नातू श्री रेवणसिद्ध यांनी पुरातन वस्तूंच्या केलेल्या अद्वितीय संग्रहामुळे तेरची ओळख ठळक झाली आहे. तेरमधील संशोधन सूत्रबद्ध पद्धतीने पुढे जाणे आवश्यक आहे, अशी भावना तेर येथील संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक अमोल गोटे यांनी व्यक्त केली.

............................................

प्रज्ञा केळकर- सिंग 

* पुरातत्त्वशास्त्राचे सध्याच्या काळातील महत्त्व काय?
इतिहास संशोधनामध्ये प्रामुख्याने लिखित गोष्टींचा आधार घेतला जातो. लिखित पुरावे नसलेल्या बिंदूपासून पुरातत्त्वशास्त्राचे काम खऱ्या अर्थाने सुरू होते. शास्त्रीय पद्धतीने, तसेच इतर अनेक शास्त्रांचा आधार घेत पुरातत्त्वशास्त्र पुढे जाते. आर्य आणि अनार्य हा वाद आपल्याकडे बºयाच काळापासून चालत आला आहे. त्याबाबत वसंत शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर संशोधन केले आहे. यापुढेही संशोधन अविरतपणे सुरूच राहील. वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान पुरातत्त्व शास्त्रासाठी वरदान ठरत आहे. विविध साधनांचा वापर करून उत्खनन करणे, संशोधन करणे, निष्कर्ष काढणे आणि त्याला शास्त्राची जोड देणे यातून पुरातत्त्वशास्त्राची बैठक बसते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची शास्त्रीय पद्धतीने मांडणी केली जाते आणि त्यातून इतिहासातील नवे संदर्भ मिळत जातात.

* शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे इतिहासाच्या जतन आणि संवर्धनासाठी काय प्रयत्न केले जात आहेत?
- गेल्या काही काळापासून शासनाकडून पुरातत्त्वशास्त्राकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. त्यात संशोधनाबरोबरच पर्यटनवाढ, प्रत्येक वस्तूचे योग्य महत्त्व अधोरेखित करणे, तांत्रिक अडथळे दूर करून उपलब्ध साधनांमध्ये हा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेर येथील संग्रहालयाच्या इमारतीसाठी शासनाने १५ कोटी ६८ लाख रुपयांची मान्यता दिली आहे. इमारतीचे काम वेगाने सुरु असून, दोन वर्षांमध्ये काम पूर्णत्वास जाईल.

* सामान्यांमध्ये इतिहास, पुरातत्त्वशास्त्राच्या साक्षरतेबद्दल, जनजागृतीबद्दल कोणत्या स्वरूपाचे प्रयत्न आवश्यक आहेत?
- शासनातर्फे संग्रहालयांसाठी मार्गदर्शन तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार, वर्षभरात विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जागतिक संग्रहालय दिन, जागतिक वारसा सप्ताह अशा दिवसांच्या अनुषंगाने जनजागृती केली जात आहे. लोकांना महत्त्व समजून सांगण्यासाठी विविध प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. त्यातून

* स्थानिक इतिहास उलगडत जातो आणि आर्थिक विकासाच्या दिशेने पावले टाकली जातात.संशोधन कोणत्या पातळीवर आहे?
- तेरमध्ये यापूर्वी ८ वेळा उत्खनन झाले आहे. २०१४-१५ मध्ये डॉ. माया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटचे उत्खनन झाले. त्याचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. आयसीएचआरची फेलोशिप डॉ. पाटील यांना मिळाली असून, त्यांचा तेरमध्ये प्रकल्प सुरू आहे. तेरचे दस्तावेजीकरण आणि कालक्रम यांचा अभ्यास  होणार आहे. संग्रहालयातील वस्तूंचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
............
* शालेय स्तरावर पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व कशा रीतीने पटवून देता येईल?
शालेय जीवनापासूनच मुलांना इतिहास, उत्खनन याबद्दल कुतूहल असते. त्यांच्या या वृत्तीला छोट्या छोट्या अभ्यासक्रमांमधून खतपाणी घालता येईल. संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने असे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी शासनातर्फे काही उपक्रम हाती घेतले जात आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘फिरते संग्रहालय’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वत्र पोहोचणे शक्य नसते. त्यांना विविध वस्तू पाहायला मिळाव्यात, यासाठी ‘फिरते संग्रहालय’ उपयुक्त ठरते. वर्गामध्ये मुले जे शिकतात, ते ज्ञान प्रात्यक्षिकातून मिळाल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडते. संस्कृतीरक्षणाच्या, वारसा जतनाच्या दृष्टीने ही मोठी बाब ठरणार आहे.

Web Title: The research of 'Ter' should proceed in a formulaic way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.