ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 23:44 IST2025-09-17T23:40:33+5:302025-09-17T23:44:56+5:30
Gajanan Bhaskar Mehendale Passes Away: गजानन मेहेंदळे हे शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते.

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Gajanan Bhaskar Mehendale Passes Away: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि ‘शिवचरित्र’कार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खासगी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी म्हणजेच १८ सप्टेंबर रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ येथे सकाळी ११ वाजता गजानन मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर एक वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
गजानन मेहेंदळे सध्या इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधनपर लेखन करत होते. १९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता. ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांसह इतिहासातील लिप्यांचा अभ्यास होता. तसेच सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होते, ज्याची सुमारे पाच हजार पाने लिहून प्रकाशित होण्यासाठी तयार झालेली आहेत.
अखेरच्या श्वासापर्यंत अखंडपणे ज्ञानयज्ञ सुरू होता
शिवचरित्र हा विषय १९६९ मध्ये त्यांनी अभ्यासाला घेतला तेव्हापासून अखेरचा श्वास घेईपर्यंत अखंडपणे त्यांचा हा ज्ञानयज्ञ सुरू होता. त्यातून आजवर त्यांनी दोन मराठी व एक इंग्रजी भाषेतील संशोधनपर ग्रंथ सिद्ध केले. त्यांनी मराठीत लिहिलेले शिवचरित्र दोन खंडांत प्रकाशित झाले आहे. ‘शिवछत्रपतींचे आरमार’ हा आणखी एक मराठी ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. त्यांनी इंग्रजी भाषेतूनही एक शिवचरित्र लिहिले आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ग. ह. खरे यांची परंपरा पुढे नेणाऱ्या गजानन मेहेंदळे यांनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ इतिहास संशोधन कार्याला वाहून घेतले होते.
शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे गाढे अभ्यासक
गजानन मेहेंदळे हे शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये ग्रंथ लिहिले आहेत, जे इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. ते क्रियाशील संशोधक होते. फारसी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन विविध भाषांसह मोडी लिपीवर त्यांचे प्रभुत्व होते. शिवचरित्र (खंड १) आणि (खंड २), शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज ही रिअली वॉज, शिवाजी लाईफ अँड टाईम, मराठ्यांचे आरमार, अशी गजानन मेहेंदळे यांची काही ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे.