पुणे: ज्या पद्धतीने विशाळगडाची नासधूस करण्यात आली तशीच नासधूस वाघ्या कुत्र्याचा मुद्दा उपस्थित करून रायगडाची करण्याचे षडयंत्र आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यापेक्षा नासधूस केली जात आहे, त्यामुळे या प्राधिकरणावरून संभाजीराजे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. रायगडाचे संवर्धनाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे, त्यावरून शिवप्रेमींचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित करून राज्यातील सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही हाके यांनी यावेळी केला.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी इतिहास अभ्यासक संजय सोनवणी उपस्थित होते. हाके म्हणाले, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार होऊन सत्तर ते ऐंशी वर्षाचा कालावधी लोटला. तेव्हापासून समाधीच्या शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याचे स्मारक आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत कोणीच तज्ज्ञ नव्हते का, हे आताच कुठून उगवले.
संभाजी ब्रिगेडने २०१२ साली कुत्र्याचे स्मारक उखडून दरीत टाकले होते. त्यानंतर पुरातत्व विभागाने लगेच हे स्मारक पुन्हा उभे केले. त्यानंतर आता पुन्हा वाघ्याच्या स्मारकाचा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. कुत्र्याचा पुतळा काढण्यासाठी संभाजीराजेंनी ३१ मेचा अल्टिमेटम दिला आहे. आम्हाला असे वाटते की ३१ मे हा मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म दिवस आहे. त्या दिवशी ३०० वी जयंती साजरी होणार आहे, यासाठी आम्ही अहिल्यादेवींच्या जन्मगावी पंतप्रधानांना आणण्याचे नियोजन करत आहोत. हा कार्यक्रम होऊ नये, म्हणूनच संभाजीराजेंनी ३१ मे दिवस निवडला आहे.
गडाचे संवर्धन करण्यासाठी संभाजीराजेंना प्राधिकरणावर घेण्यात आले आहे. मात्र, ते गडांचे संवर्धन करायचे सोडून नासधूस करत आहेत. विशाळगडाप्रमाणे त्यांना रायगडाचीही नासधूस करायची आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. प्राधिकरणाकडून गडावर करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्याकडे कुणाचे लक्ष जाऊ नये, म्हणून वाघ्या कुत्र्याचा वाद उकरून राज्यातील वातावरण कलुषित करण्याचे काम केले जात आहे. हा उद्योग केवळ ब्राह्मण द्वेषापोटी केला जात आहे. राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीत अडकविण्याचे काम संभाजीराजे करत आहेत, त्यामुळे त्यांची प्राधिकरणावरून हकालपट्टी करावी, असेही हाके म्हणाले.