काँग्रेसचा किल्ला ढासळल्याची खंत! पुण्यातील पडझड सावरण्यासाठी सरसावली जुनी युवक काँग्रेस
By राजू इनामदार | Updated: January 31, 2024 15:18 IST2024-01-31T15:18:03+5:302024-01-31T15:18:48+5:30
बाळासाहेब ठाकरे कलादालनात मंगळवारी रात्री ही बैठक झाली...

काँग्रेसचा किल्ला ढासळल्याची खंत! पुण्यातील पडझड सावरण्यासाठी सरसावली जुनी युवक काँग्रेस
पुणे : पक्षाचे पुण्यातील वैभव परत आणण्यासाठी पुन्हा पक्षकार्याला लागण्याचा निर्धार शहरातील युवक काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केला. लोकसभेसाठी पक्षाचा उमेदवार कोणीही असो, त्याला निवडून आणण्यासाठी आपापल्या भागात पक्षाचे संघटन वाढवण्याचे ठरवण्यात आले.
युवक काँग्रेसचे माजी पदाधिकारी व राज्य कार्यकारिणीचे प्रदेश चिटणीस संजय बालगुडे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
बाळासाहेब ठाकरे कलादालनात मंगळवारी रात्री ही बैठक झाली. शहराच्या वेगवेगळ्या भागातील युवक काँग्रेसचे जुने पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. बहुतेकांनी पक्षाच्या पुण्यातील राजकीय अवस्थेबद्दल खंत व्यक्त केली. याच पुण्यातून एकेकाळी लोकसभेला एकहाती विजय मिळत असे, विधानसभा, महापालिका पक्षाच्या ताब्यात असायची. आता मात्र महापालिकेला नगरसेवकांची दोन अंकी संख्या पार करणेही अवघड झाले आहे अशा व्यथा बैठकीत अनेकांनी बोलून दाखवली.
हे कोणामुळे झाले? का झाले? या विषयावर काहीही चर्चा करायची नाही, कोणालाही दोष द्यायचा नाही असे बैठकीआधीच ठरवण्यात आले होते. त्यामुळे टीकाटिपणी न करता काय करता येईल यावर चर्चा करण्याचा निर्णय बैठकीत झाला. पेठांमधील पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी, त्यांचे मेळावे, पक्षाच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती यापद्धतीने काम करण्याचे ठरले. पक्षाने आपल्याला आतापर्यंत बरेच काही दिले, पदे दिली, ओळख दिली, आता पक्षाला द्यायची वेळ आली आहे, त्यामुळे आपापला व्यवसाय, उद्योग सांभाळून पक्षासाठी वेळ देण्याचा निर्णय बैठकीत झाला. विद्यमान नेत्यांना न दुखावता, आपापल्या पद्धतीने काम करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.