पुणे : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला. ही घटना तळजाई वसाहतीत घडली. याप्रकरणी सहकारनगरपोलिसांनी पतीला अटक केली. पूनम दत्ता अडागळे (वय ३२, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, पद्मावती) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती दत्ता राजाराम अडागळे (वय ३८) याला अटक करण्यात आली. याबाबत पूनम हिने सहकारनगरपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता याचा पूनम हिच्यासोबत २०१५ मध्ये विवाह झाला. त्यांना सात वर्षांचा मुलगा आहे. दत्ता काही कामधंदे करत नव्हता, तसेच त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. पूनम उदरनिर्वाहासाठी घरकाम करतात. सोमवारी (दि. ३१ ) रात्री आठच्या सुमारास दत्ता दारू पिऊन घरी आला. त्याने अजून दारू पिण्यासाठी पूनमकडे पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर चिडलेल्या दत्ताने घरातील कुऱ्हाडीने पूनमवर हल्ला चढविला. पूनमने आरडाओरडा केला असता, सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. डाेक्यात घाव बसल्याने पूनम गंभीर जखमी झाली. दत्ताला पोलिसांनी अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक रेखा साळुंके तपास करीत आहेत.