लोककलांचे ‘रिडिझायनिंग’ करायला हवे
By Admin | Updated: February 8, 2017 02:40 IST2017-02-08T02:40:37+5:302017-02-08T02:40:37+5:30
लोककलेसंबंधी शासनाच्या योजना कागदोपत्री पाहिल्या तर भरघोस दिसतात. तरीही सध्याच्या परिस्थितीमध्ये लोककलेची अवस्था पूर्वीसारखीच का आहे?

लोककलांचे ‘रिडिझायनिंग’ करायला हवे
लोककलेसंबंधी शासनाच्या योजना कागदोपत्री पाहिल्या तर भरघोस दिसतात. तरीही सध्याच्या परिस्थितीमध्ये लोककलेची अवस्था पूर्वीसारखीच का आहे? लोककला ही अजूनही आर्थिक रेषेखाली का आहे? याचा विचार होताना दिसत नाही. आज योजना केवळ तयार केल्या जात आहेत. त्याचा उपयोग होत नाही. या योजना कागदोपत्री न ठेवता त्यांच्या फलितांचे आॅडिट आणि लोककलांचे ’रिडिझायनिंग’ व्हायला हवे, अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे यांनी व्यक्त केली.
समाजामधील कुठलीही व्यक्ती खुर्चीवर बसून ठरवू शकत नाही की लोककलेकडे कसे आणि कुठल्या दृष्टिकोनातून बघायला हवे. समाज केवळ एकच विचार करतो, की आम्हाला ज्या मनोरंजनाची गरज आहे ते मिळते का नाही! आजची सामाजिक परिस्थिती पाहिली तर मनोरंजनाची गरज भागविण्यासाठी मल्टिप्लेक्स, दूरचित्रवाहिन्या यांच्यासह अगदी मोबाईलसारखी साधने उपलब्ध आहेत, या सर्व सुख-सुविधा सोडून लोकांनी रस्त्यावरच्या किंवा मंदिरातील लोककलेला महत्त्व देणे हे भाबडेपणाचे लक्षण म्हणता येईल.
लोककला ही नवीन पद्धतीने कशा प्रकारे समाजापर्यंत पोहोचेल, यासाठी शासन आणि कलावंतांनीही प्रयत्न करायला हवा. लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी शासनस्तरावर कागदोपत्री विविध योजनांची आखणी केली जाते. दिसायला या योजना भरघोस असल्याचे भासते, पण तरीही लोककलांची परिस्थिती बदललेली नाही. लोककला ही अद्यापही आर्थिक रेषेखालीच आहे. फक्त योजना तयार केल्या जात आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने या योजनांचा काही उपयोग होत नाही, अशी परिस्थिती आहे. शासनाने या योजना केवळ कागदोपत्री न ठेवता त्या योजनांचे फलित आहे त्या प्रत्यक्षात कशा अमलात येतील, याचे ‘आॅडिट’ करून त्याचे रिडिझायनिंग करायला हवे.
लोककला जगवायची असेल तर लोककलावंतांना जगवायला हवं. कलावंतांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे.
उदा : कोकणातील चित्रकथी करणारी शेवटची पिढी आजच्या काळात वीटभट्टीवर कामाला
आहे.
शासनाने/विद्यापीठाने या कलावंतांना आर्थिक मदत केली असती तर वीटभट्टीवर काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. या कलावंतांसाठी, त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी त्यांच्या कलांचे सादरीकरण आकाशवाणी, दूरदर्शनवर व्हायला हवे.
लोककला केंद्रांनी काय कराव अथवा काय करू नये, हे आपण त्यांना सांगू शकत नाही आणि ठरवूही शकत नाही. त्यासाठी शासनाने आणि सर्व विद्यापीठांनी लोककलेचा दर्जा कशा प्रकारे उंचावेल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत या कलावंतांसाठी फिरती ओपीडी तसेच फिरती शाळा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ज्या ज्या ठिकाणी तमाशाचे प्रयोग होतात त्या त्या भागात फिरती ओपीडी जाऊन कलावंतांवर मोफत उपचार करणार आहे.
कलावंतांच्या व्यवसायामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सातत्याने केल्या जाणाऱ्या भटकंतीमुळे शाळांशी त्यांची ओळखच होत नाही. ही मुले साक्षर झाली तर स्वत:च्या पायावर उभी राहू शकणार आहेत, याच जाणिवेतून त्यांच्या मुलांसाठीही फिरती शाळा निर्माण केली जाणार आहे. विद्यापीठातर्फे लोककलेचा अभ्यास, संशोधन आणि त्यांचे कल्याण अशा तीन पातळीवर काम सुरू आहे.
लोककलेला आधुनिक पद्धतीने समाजासमोर मांडण्याच्या दृष्टीनेदेखील प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे कलावंतांसाठी ‘ट्रॅव्हलिंग मॅप’ तयार केला जात आहे. राज्यात कुठल्या भागात
तमाशा कुठे सुरू आहे ते ठिकाण माहीत होण्यासाठी या नकाशाचा नक्कीच उपयोग होईल. या नकाशाद्वारे लोककलांपर्यंत
फिरती ओपीडी आणि फिरती
शाळा पोहोचविणेही शक्य होईल.