पुणे : पुण्यातील कोकणवासीय गणेशोत्सवासाठी दरवर्षी मूळ गावी जातात. यासाठी ‘लालपरी’ला मोठी मागणी असते. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांकडून १४१ बसचे ग्रुप बुकिंग करण्यात आले आहे, तर ऐनवेळी जाणाऱ्या भाविकांसाठी ७० जादा बसची सोयी पुणे एसटी विभागाकडून करण्यात आले आहे. या सर्व बस रविवार, दि. २४ ते २६ या तीन दिवसांत धावणार आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कामानिमित्त स्थायिक असलेल्या कोकणवासीय एकत्रित येऊन ग्रुपद्वारे गावी जातात. कोकणात जाणाऱ्या भाविकांनी सुरक्षित प्रवासासाठी आजही एसटीला पसंती देतात. एक महिन्यापूर्वीच बसचे ग्रुप बुकिंग करण्यात येते. पुणे विभागातून स्वारगेट आणि पिंपरी-आगारातून लालपरी काेकणात सोडले जाते. या बस दि. २४ ते २६ ऑगस्ट या तीन दिवसांत सोडण्यात येणार आहे. शिवाय ज्या भाविकांनी ग्रुप बुकिंग केले नाही, त्यांच्या सोयीने जाणार आहे. त्यांच्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. यंदा मागील वर्षापेक्षा भाविकांकडून जादा बस बुक करण्यात आले आहे. शिवाय अजून मागणी असेल तर एसटी देण्याची सोय एसटी प्रशासनाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कोकणातील या ठिकाणी आहेत ग्रुप बस
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, गुहागर, सावर्डे, खेड, माणगाव, दापोली, देवरुख, सावंतवाडी, देवगड, लाजा, साखरपा व इतर ठिकाणी जाणाऱ्या भाविकांनी १४१ एसटी ग्रुपद्वारे बुक केले आहे. यामध्ये ४२ प्रवाशांचा ग्रुप असतो. ग्रुप बुक केल्यामुळे एसटी दारांपर्यंत जाते. त्यामुळे भाविक ग्रुप बुकिंगला प्राधान्य देत आहेत. शिवाय एसटी प्रशासनाकडून राज्य सरकारच्या सर्व सवलती देण्यात येते. त्यामुळे प्रवाशांकडून एसटीला चांगला प्रतिसाद मिळतो.
येथून सुटतील गणपती स्पेशल बस
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होणाऱ्या वाहतूक काेंडीमुळे एसटी प्रशासनाकडून विविध ठिकाणावरून या बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या बस बुक केलेल्या भाविकांना थेट त्याच ठिकाणी बोलावण्यात आले आहे. पुण्यातून स्वारगेट, पु. ल. देशपांडे उद्यान, निलायम टाॅकीज, मित्रमंडळ चाैक, दांडेकर पूल, कात्रज चाैक, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी येथून बस सोडण्यात येणार आहे.
शहरनिहाय आकडेवारी
रत्नागिरी -- ०८चिपळूण -- १८गुहागर -- २०देवगड - १४सावंतवाडी - १२दापोली - ०९मालवण -- ०८राजापूर -- १०
पुण्यातून यंदा गणपतीसाठी २०० पेक्षा जास्त बसची सोय करण्यात आली आहे. या बस नियोजित वेळी उत्सव काळात सोडण्यात येणार आहे. भाविकांनी खासगी गाड्यांचा वापर न करता, सुरक्षित प्रवासासाठी एसटीला प्राधान्य द्यावे. -कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी